वर्तवणूक सुधारली नाही, हातभट्टी सुरूच ठेवली, चौघांना जेल घडली!
By विजय.सैतवाल | Published: December 29, 2023 06:11 PM2023-12-29T18:11:42+5:302023-12-29T18:11:55+5:30
अट्टल चार गुन्हेगार स्थानबद्ध, एमपीडीएअंतर्गत कारवाई : चार वेगवेगळ्या कारागृहात रवानगी.
जळगाव : विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री आणि धोकेदायक व्यक्ती ठरलेल्या जिल्ह्यातील चार जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार चारही जणांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जामनेर पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल असलेल्या योगेश भरत राजपूत (२९, रा. जामनेर) हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली. मात्र त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा न झाल्याने जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला. तसेच पहूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेला सुपडू बंडू तडवी (४२, रा. चिलगाव, ता. जामनेर) हादेखील हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी पाठविला. या शिवाय रावेर पोलिस ठाण्यात शेख शाहरुख शेख हसन (२६, रा. रावेर) याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच योगेश देविदास तायडे (३३, रा. भुसावळ) याच्यावरदेखील भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल दाखल आहे. त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला. त्यांनी चारही प्रस्तावांचे अवलोकन करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार त्यांनी चारही जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हेगार योगेश राजपूत याला ठाणे, सुपडू तडवी याला अमरावती, शेख शाहरुख शेख हसन याला कोल्हापूर कारागृहात आणि गुन्हेगार योगेश तायडे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
या प्रस्तावांचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, पोहेकॉ जयंत चौधरी, पोकॉ ईश्वर पाटील यांनी पाहिले.