रशियात बुडालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह गुरुवारी मुंबईत येणार
By सुनील पाटील | Published: June 12, 2024 09:37 PM2024-06-12T21:37:04+5:302024-06-12T21:37:11+5:30
जळगाव : रशिया येथे नदीपात्रात बुडून मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर गुरुवार दि. १३ जून रोजी मुंबई ...
जळगाव: रशिया येथे नदीपात्रात बुडून मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर गुरुवार दि. १३ जून रोजी मुंबई विमानतळावर पोहोचणार आहेत हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाचोरा व अमळनेर प्रांताधिकार्यांना प्राधिकृत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी (वय २०), जिशान अशफाक पिंजारी (वय २०) दोन्ही रा. अमळनेर तसेच हर्षल अनंतराव देसले (वय १९) रा. भडगाव या तिनही विद्यार्थ्यांचा ४ जून रोजी रशियातील वोल्खोव्ह नदीत बुडुन मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने भारतीय वाणिज्य दुतावास देवीचरण धुलीदास यांनी पाठविलेल्या पत्रानुसार तिनही मयत विद्यार्थ्यांचे शव १३ जून रोजी दुपारी एक वाजता विमानाने दुबई येथून रवाना होतील व मुंबई विमानतळावर सायंकाळी ५.४५ वाजता पोहचणार आहेत.
या विद्यार्थ्यांचे शव मुंबई विमानतळावरुन शासकीय प्रचलीत प्रक्रीयेनुसार ताब्यात घेऊन नातेवाईकांकडे सोपविण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर व पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना प्राधिकृत केले आहे.