लोकमतचा दणका...; ग्रा. पं. सदस्यांना बसणार वाळूचे चटके, ‘गिरणेची चाळण’प्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:36 PM2023-08-01T15:36:07+5:302023-08-01T15:39:05+5:30
या दोन्ही गावांतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
जळगाव : गिरणा नदीतील चाळणप्रकरणी रविवारी जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी जळगाव प्रांताधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष करत ग्रामदक्षता समितीचा अहवाल न पाठविल्याच्या कारणावरून आव्हाणे व खेडी बुद्रुक येथील पोलिस पाटील यांना निलंबित केले आहे, तर या दोन्ही गावांतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
आव्हाणे गावानजीक गिरणा नदीपात्रातून एकाचवेळी ३५ ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे छायाचित्र १८ मे २०२३ रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते.
या घटनेची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेत सुमोटो केस दाखल करून घेत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पिंप्राळा मंडलाधिकारी किरण बाविस्कर यांनी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
आव्हाणे व खेडी बुद्रुकचे पोलिस पाटील निलंबित
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी आव्हाणेचे पोलिस पाटील जितेंद्र देवीदास पाटील व खेडी खुर्दचे पोलिस पाटील शरद जगन सपकाळे यांना निलंबित केले आहे. या दोघांचा पदभार शेजारील गावाच्या पोलिस पाटील यांच्याकडे सोपविण्याचा आदेश केला आहे.
सरपंचासह सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव
प्रातांधिकारी यांनी आव्हाणे व खेडी बुद्रुक सरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना अपात्र करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला आहे.