प्रवास सुरू होण्याआधीच बसला बिघाड झाला होता, अपघाताचे वृत्त कळताच उडाला थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 09:17 AM2024-08-24T09:17:37+5:302024-08-24T09:18:28+5:30
पाच ते सात किलोमीटर पुढे गेल्यानंतर पहिल्या वाहनातील भाविक चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबले.
- सुधीर चौधरी
यावल (जि. जळगाव) : प्रवास सुरू होण्यापूर्वी अपघातग्रस्त बसमध्ये काही बिघाड झाला होता. त्यावेळी स्थानिक मॅकेनिकला बोलावून दुरुस्ती करण्यात आली. यानंतर दोन्ही बसमधून भाविकांचा प्रवास सुरू झाला.
पाच ते सात किलोमीटर पुढे गेल्यानंतर पहिल्या वाहनातील भाविक चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबले. त्यावेळी मागच्या बसला भीषण असा अपघात होऊन बस नदीमध्ये पडल्याचे समजताच आमच्या सर्वांचा थरकाप उडाला. राणे यांच्यासोबत संजय ढाके, प्रमोद सरोदे , मनोज चौधरी (रा. वरणगाव) यांनीही या अपघाताबद्दल माहिती दिली. पहिल्या बसमध्ये ४४ प्रवासी तर लहान बसमध्ये १० प्रवासी होते.
नेपाळला जाण्याचा मोह टाळला आणि ते वाचले
जळगाव : वरणगाववर १८ वर्षांनंंतर पुन्हा एवढी मोठी आपत्ती कोसळली आहे. ३० ऑक्टोबर २००६ रोजी वरणगावचे काही भाविक शिर्डी, शनी शिंगणापूर अशा तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. ह्या भाविकांच्या वाहनाला गावाकडे परतताना भीषण अपघात झाला होता. त्यात ८ जण ठार झाले होते.
२००६ मधील त्या घटनेत आपली सहचारिणी गमावलेले दत्तात्रय झांबरे हे सुदैवी ठरले. तेही अयोध्या गेलेले होते. तेथे नेपाळला जाणारी ही पर्यटक मंडळी त्यांना भेटली होती आणि त्यांच्यासोबत पाच जागा रिकाम्या असल्याने नेपाळला येण्याचा आग्रह त्यांना काही जणांना केला होता पण झांबरेसह अयोध्येला गेलेल्या भाविकांनी ते टाळल्याने सुदैवी ठरले.