सातपुड्यातील ‘कोंबडी’ जाणार साईबाबांच्या दर्शनाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 06:26 PM2023-03-12T18:26:33+5:302023-03-12T18:26:49+5:30
अस्सल गावरान म्हणून ओळख असणारी सातपुड्यातील कोंबडी राष्ट्रीय राष्ट्रीय 'महापशुधन एक्सपो'त जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
जळगाव : अस्सल गावरान म्हणून ओळख असणारी सातपुड्यातील कोंबडी राष्ट्रीय राष्ट्रीय 'महापशुधन एक्सपो'त जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. विविध पक्ष्यांसह जनावरांचा अभ्यास केल्यावर पशुसंवर्धन तज्ज्ञ ‘सातपुडा कोंबडी’च्या प्रेमात पडले आणि यानिमित्ताने पहिल्यांदाच जा ‘सातपुडा कोंबडी’ देशव्यापी प्रदर्शनात सहभागी होणार आहे.
शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील 'महापशुधन एक्सपो २०२३' चे आयोजन २४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान करण्यात आले आहे.४६ एकराच्या क्षेत्रात भरणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील ६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्याच्या जाती सहभागी होणार आहेत. त्यात ‘सातपुडा कोंबडी’ला संध मिळाली आहे.
काय आहे ‘सातपुडा कोंबडी’?
या कोंबडीवाढीचा वेग चांगला, अधिक अंडी उत्पादन क्षमता, चांगली रोगप्रतिकारक्षमता असल्याने परसातील कुक्कुटपालनासाठी ही योग्य जात आहे.
प्रदर्शन कशासाठी?
कुंदन पाटील
प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध मांस अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, लिंग विनिश्चित केलेल्या विर्यमात्राचा कृत्रिम रेतन कार्यक्रमात वापर, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पशुधनमालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रदर्शन आहे. सातपुड्यात विकसित झालेली कोंबडी जळगावचे प्रतिनिधीत्व करणार आहे.अस्सल गावरान जातीची ही कोंबडी नक्कीच अनेकांच्या पसंतीला उतरणार आहे.
-डॉ.शामकांत पाटील, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.