जळगावमध्ये गिरणेच्या आवर्तनाचे पाणी आणखी १५ दिवस कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:30 PM2023-03-09T17:30:35+5:302023-03-09T17:32:04+5:30
कुंदन पाटील जळगाव : गिरणा धरणातून सोडलेल्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या चारीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आणखी ...
कुंदन पाटील
जळगाव : गिरणा धरणातून सोडलेल्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या चारीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आणखी आगामी १५ दिवस पाण्याचा प्रवाह कायम राहणार आहे. रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचे पाणी शेवटच्या पाटचारीपर्यंत पोहोचत नसल्याची काही शेतकऱ्यांची तक्रार होती. त्याची दखल घेत प्रशासनाने आवर्तन दि.२० ऐवजी २५ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे ‘रब्बी’ला पाण्याचे पुरेसे बुस्टर मिळण्यास मदत होणार आहे.
पिण्यासाठी दोन आवर्तने
गिरणा नदी आणि बोरी नदीच्या माध्यमातून एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईग्रस्त गावांसाठी आणि तिथल्या अधिग्रहित केलेल्या विहिरींसाठी प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्याची नियोजन आहे. गिरणाच्या माध्यमातून पाच तर बोरीच्या माध्यमातून तीन तालुक्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
टंचाई आराखड्यानुसार नियोजन
जिल्हा प्रशासनाने ४३२ गावांना संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणार आहे, असे गृहित धरुन उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार १९ विंधन विहिरी ताब्यात घेतल्या जाणार असून ४०२ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विहिरींना पाणी उपलब्ध करण्यासाठी गिरणा पाटबंधारे विभाग सजग राहणार असल्याचे सांगण्यात आले.