प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली जळगाव नगरी; चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

By अमित महाबळ | Published: March 30, 2023 08:08 PM2023-03-30T20:08:38+5:302023-03-30T20:08:52+5:30

शहराच्या वेगवेगळ्या भागात श्रीराम नववीचा उत्साह होता.

The city of Jalgaon resounded with the shouts of Lord Sri Rama; Breathtaking demonstrations drew attention | प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली जळगाव नगरी; चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली जळगाव नगरी; चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

googlenewsNext

जळगाव : सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे आयोजित शोभायात्रेतील मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेझीम पथकाचे सादरीकरण आणि सजीव देखाव्यांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेचा मार्ग भगवे ध्वज, पताका लावून सजविण्यात आला होता. मार्गावर सुंदर रांगोळी रेखाटण्यात आलेली होती. श्रीराम भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी होती. 

सुरुवातीला कारसेवकांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गोलाणी मार्केटजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी कारसेवक मुकुंद धर्माधिकारी, सचिन नारळे, पुरुषोत्तम बारी, मुकुंद कासार, मुकुंद मेटकर, महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, डीवायएसपी संदीप गावित, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी सतीश कुलकर्णी, सुनील भंगाळे, सुरेश तलरेजा, ललित कोल्हे, किशोर भोसले, अमित भाटीया, दीपक जोशी, ललित चौधरी, विष्णु भंगाळे, शरद तायडे, अमित काळे, बंटी नेरपगारे, अजय गांधी, अजिंक्य देसाई, पियूष कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लेझीम पथकांचा सहभाग

ढोलताशांच्या निनादात आणि श्रीरामाच्या जयघोषात शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेच्या अग्रस्थानी श्रीराम रथ होता. त्यानंतर मुलींचे लेझीम पथक, श्रीराम व सीता यांचा सजीव देखावा, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम व रामभक्त हनुमान यांची मूर्ती असलेला रथ लक्ष वेधून घेत होता. 

उत्साहाला भरते..

शहराच्या वेगवेगळ्या भागात श्रीराम नववीचा उत्साह होता. शनिपेठ मित्र मंडळ, महर्षी वाल्मीक मित्र मंडळ, शिवाजीनगर हुडको मित्र मंडळ यांनी काढलेली शोभायात्रा नंतर सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या मुख्य शोभायात्रेत सहभागी झाली.

चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

कोल्हापूर येथील सव्यसाचि आखाडा यांच्या मर्दानीच्या खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांना जळगावकरांकडून जोरदार दाद मिळाली. शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. गोलाणी मार्केट, चित्रा चौक, दाणा बाजार, सुभाष चौक, रथ चौक मार्गे ग्राम दैवत श्रीराम मंदिर संस्थानाजवळ यात्रेचा समारोप करण्यात आला.

Web Title: The city of Jalgaon resounded with the shouts of Lord Sri Rama; Breathtaking demonstrations drew attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.