मुले क्लासमधून येताच दिसला आईचा मृतदेह, पिंप्राळा परिसरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By विजय.सैतवाल | Published: October 31, 2023 03:03 PM2023-10-31T15:03:44+5:302023-10-31T15:04:28+5:30
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : पती नोकरीवर तर मुले क्लासला गेलेले असताना सीमा शशिकांत कासोट (३३, रा. सिद्धीविनायक कॉलनी) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले क्लासमधून घरी आले त्या वेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शशिकांत कासोट हे सिद्धीविनायक कॉलनीमध्ये पत्नी व मुलासह राहतात. सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी कासोट हे कामावर गेलेले होते. तर त्यांचे मुले क्लासला गेलेले होते. त्यामुळे सीमा कासोट या घरी एकट्याच होत्या. त्या वेळी त्यांनी घरात ओढणीने गळफास घेतला. संध्याकाळी मुले क्लासमधून घरी आले तर घराचा दरवाजा आतून लावलेला होता.
मुलांनी बराच वेळ आवाज दिला तर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारील मंडळींना सांगितले. त्या वेळी त्यांनी दरवाजा उघडला असता मुलांसह शेजारील मंडळींना सीमा या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. या विषयी विवाहितेचे पती व रामानंद नगर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या वेळी पोलिस तेथे पोहचले व विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांनी मयत घोषित केले.
या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.