इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो;गिरीश महाजनांनी वर्तवली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 13:15 IST2023-07-22T13:15:07+5:302023-07-22T13:15:16+5:30
जी 20 युवा संवाद कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची आपबिती कथन केली.

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो;गिरीश महाजनांनी वर्तवली भीती
- प्रशांत भदाणे
जळगाव- इर्शाळवाडीची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा तीन आकडी असू शकतो, अशी भीती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवली आहे. जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित जी 20 युवा संवाद कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची आपबिती कथन केली. यावेळी ते बोलत होते.
ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पहाटे तीन वाजता घटनास्थळ गाठलं. वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे बचावकार्यात खूप अडथळे आहे. सुरुवातीला काही लोकांना वाचवलं. ही दुर्घटना मोठी आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत फक्त 22 ते 24 लोकांचे मृतदेह हाती आले आहेत. मृतांचा आकडा हा दुर्दैवाने तीन आकडी असू शकतो, अशी भीती गिरीश महाजन यांनी वर्तवली आहे. इर्शाळवाडी गावात अडीचशे कुटुंब वास्तव्याला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर या दुर्घटनेतील शंभर ते सव्वाशे लोक आतापर्यंत ट्रेस आऊट झालेली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढू शकतो, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.