आयुष्याचे वाळवंट 40 वृक्षांच्या हिरवळीने केले दूर, कॅन्सरशी लढत जगवली वृक्षराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 08:55 AM2024-09-06T08:55:10+5:302024-09-06T08:55:31+5:30
अन्नदेखील गिळता येत नाही, अशा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत कासोदा, ता. एरंडोल येथील गोरख महादू मराठे (५०) यांनी सार्वजनिक विद्यालयात तब्बल ४० झाडे जगवली आहेत.
- प्रमोद पाटील
कासोदा (जि. जळगाव) - अन्नदेखील गिळता येत नाही, अशा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत कासोदा, ता. एरंडोल येथील गोरख महादू मराठे (५०) यांनी सार्वजनिक विद्यालयात तब्बल ४० झाडे जगवली आहेत.
गोरख मराठे हे शाळेत नाईक पदावर कार्यरत आहेत. त्यांना कॅन्सरचे निदान झाले आणि पायाखालची जमीनच जणू हादरली; पण हार मानायची नाही, असा त्यांनी निश्चय केला. त्यांनी कॅन्सरशीच लढा सुरू केला. आपले मन कुठे तरी रमावे, म्हणून वृक्षवल्लीला त्यांनी आपले सोयरे बनवण्याचे ठरवले.
गोरख पाटील हे विद्यालयात नाईक या पदावर काम करतात; गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्याला अन्न गिळता येत नाही, अशा परिस्थितीत त्यांनी वृक्ष जगवून विद्यार्थी आणि आम्हालाही सावली दिली आहे.
- नरेंद्र पाटील, माजी मुख्याध्यापक, सार्वजनिक विद्यालय, कासोदा.
रोपांची झाली झाडे
- सन २०१६-१७ मध्ये गोरख मराठे यांनी या शाळेत ४० रोपे लावली. शाळेशेजारी नाला वाहतो, गावातील गटारींचे पाणी या नाल्यात येते. या नाल्यातून वाहणारे पाणी उन्हाळ्यात या रोपांना देण्याचे काम गोरख इमानेइतबारे करीत राहिले.
- नाला आटल्यावर आजूबाजूच्या हातपंपातून पाणी आणून रोपांना टाकले, नंतर या शाळेने आवारात बोअर केला, तेथे पाणी लागले. या शाळेतील बोअरचे पाणी देणे सोपे झाले. आजही सर्व रोपं वृक्ष होत आहेत. सावली तर देत आहेतच शिवाय शाळेचे आवार निसर्गरम्य व हिरवेगार दिसू लागले आहे. सोबत कॅन्सरशीही लढा सुरूच आहे.