दस्ताऐवज महिनाभर दडविले, निकृष्ट कामांकडे डोळेझाक!
By सुनील पाटील | Published: January 6, 2024 03:48 PM2024-01-06T15:48:09+5:302024-01-06T15:48:39+5:30
आयुक्तांनी घेतले अभियंत्यांना फैलावर, तीन दिवसात मागितला खुलासा
जळगाव : निविदाधारकांनी आवश्यक असलेली दस्तऐवज निविदेसोबत जोडलेली असतांनादेखील त्यांना दस्तऐवजांची पूर्तता करण्याबाबत कळविण्यात आले आणि तद्नंतर ही नस्ती सुमारे एक महिना दडवून ठेवत प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रताप एक अभियंत्याने केला तर दुसऱ्याने गटारीच्या निकृष्ट कामांकडे डोळेझाक केली.
महापालिकेला आर्थिक झळ पोहचण्यासह निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रकरणात महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता समीर शशिकांत बोरोले व मनिष गंगाधर अमृतकर या दोघांना जबाबदार धरत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी फैलावर घेतले असून तीन दिवसात लेखी खुलासा सादर करावा अशी नोटीस बजावली आहे.
महानगरपालिकेत काही अधिकारी व कर्मचारी प्रशासनाशी प्रामाणित न राहता विशिष्ट यंत्रणेसाठीच काम करीत असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. यापूर्वी देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीसंदर्भाचे पत्र दडवून ठेवण्यात आल्याचा आरोप तत्कालीन महापौर जयश्री महाजन यांनी प्रशासनावर केला होता. अभियंत्यांच्या बदल्यांच्यावेळी देखील काही जणांनी दबावतंत्राचा वापर केल्याचे समोर आले होते. दोन दिवसापूर्वी आयुक्तांनी प्रभाग क्र. ३ मध्ये सुरु असलेल्या काँक्रीट रस्ते, गटार व स्लॅब कल्व्हर्ट बांधकामाची पाहणी केली असता हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे उघड झाले होते. या कामावर नियंत्रणाची जबाबदारी असलेले कनिष्ठ अभियंता मनिष अमृतकर यांनी त्याकडे डोळेझाक केल्याचे निदर्शनास आले.