वर्षभरात उद्ध्वस्त झालं कुटुंब; एकामागोमाग तिघांनी घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 01:23 PM2024-12-06T13:23:44+5:302024-12-06T13:28:59+5:30
दुःखातून परिवार सावरत नाही, तोच घरातील कर्त्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
भुसावळ : दुर्दैव मागे लागलं की ते पाठ सोडत नाही, असे म्हटले जाते. याचा दुःखदायी अनुभव शहरातील अहिरे कुटुंबाला आला आहे. एक वर्षात एकाच कुटुंबातील दोघे पुरुष गेल्यानंतर त्या दुःखातून सावरत नाही, तोच घरातील तरुण मुलाचा लोणावळा येथील पवना धरणात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे अहिरे कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे. हे कुटुंब मूळ खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील असून, त्यांचे पद्मावतीनगर, भुसावळ येथे घर आहे.
मयत तुषार अहिरे हा तरुण पुण्यातील बालेवाडीत खासगी कंपनीत कामाला होता. तुषार अहिरे (२६) हा आपला मित्र मयूर भारसके व अन्य आठजण असे पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आल्यानंतर भुसावळातील दोघा मित्रांना दुधीवरे हद्दीतील पवना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. पोहताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.
तुषार अहिरे हा अ. भा. सरपंच संघटनेचे राज्य सचिव विवेक ठाकरे यांच्या मावस भावाचा मुलगा असल्याने त्यांनी मावळ तालुका सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन अग्रवाल यांनी त्यांच्या संस्थेच्यावतीने खंडाळा (पुणे) येथून भुसावळ येथे मृतदेह पोहोच करण्यासाठी मोफत शववाहिका उपलब्ध करून दिली. बुडालेल्या तुषार (सोनू) अहिरे याचे वडील रवींद्र यांचे गेल्या मार्च महिन्यात निधन झाले. आजोबा प्रकाश अहिरे यांचे गत नोव्हेंबर महिन्यात निधन झाले होते. या दुःखातून परिवार सावरत नाही, तोच घरातील कर्त्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अहिरे परिवार हा रेल्वे नोकरीनिमित्त भुसावळात स्थायिक आहे.
आज अंत्यसंस्कार
पवना धरणात बुडून मरण पावलेल्या तुषार अहिरे या तरुणाची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ८ वाजता भुसावळ येथील लाल जैन मंदिर, पद्मावती नगर, भुसावळ येथील घरापासून निघणार आहे.