होऊ द्या खर्च! सरकार करणार भरपाई; सौरऊर्जेसाठी ७८००० सब्सिडी
By अमित महाबळ | Published: February 25, 2024 09:09 AM2024-02-25T09:09:37+5:302024-02-25T09:10:07+5:30
केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
जळगाव : ‘प्रधानमंत्री - सूर्यघर मोफत वीज योजने’त तीन किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. महावितरणच्या अंदाजानुसार, दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीजवापर असणाऱ्या कुटुंबांसाठी दोन ते तीन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरू शकते.
घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.
केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तीन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॉटला १८ हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल. या योजनेत केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळणार आहे. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली, तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित करण्यात आलेले आहे. दरम्यान, दि. १३ फेब्रुवारी २०२४ नंतर रूफ टॉप सोलरसाठी राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून अनुदान
किलोवॉट क्षमता - अनुदान रक्कम
एक - ३० हजार रुपये
दोन - ६० हजार रुपये
तीन - ७८ हजार रुपये
नोंदणी कुठे कराल?
वीज ग्राहकांनी रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करायची आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाइल ॲपही उपलब्ध आहे. राज्यात दि. २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १,२७,६४६ झाली होती. त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता १९०७ मेगावॉट झाली आहे.
वीजनिर्मिती अशी होते...
एक किलोवॉट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॉटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीजवापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.
लाभ घ्या...
ग्राहकांनी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा आहे. सरकारकडून अनुदान मिळणार आहे, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन दिवटे यांनी दिली.