"दगड मारणारे हात आता खोक्यांनी भरले आहेत", अंबादास दानवेंचा गुलाबराव पाटलांना टोला
By विलास.बारी | Published: April 23, 2023 03:05 PM2023-04-23T15:05:17+5:302023-04-23T15:05:45+5:30
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आव्हान दिले जात आहे. मात्र तरीही ही सभा विराट होईल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
जळगाव : शिवसेनेच्या पाचोरा येथे होणा-या सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दगड फेकीचे आव्हान दिले जात आहेत. मात्र दगड मारणारे हे हात आता खोक्यांनी भरले असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जळगावात केला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही प्रशासनासोबतच पालकमंत्र्यांची असते. मात्र जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दगड मारण्याची भाषा करत असतील तर शासनाने व गृहविभागाने त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आव्हान दिले जात आहे. मात्र तरीही ही सभा विराट होईल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. सध्या निवडणुका नाहीत. सभेच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्ष हा लोकशाही मार्गाने आपले विचार मांडत असतो. ज्यांना एेकायचे असेल त्यांचे स्वागत आहे. ज्यांना एेकायचे नसेल त्यांनी कानात बोळे घालावे असा सल्ला त्यांनी दिला.
...तर तुमच्या सभा होतील तेव्हा आम्हाला विचार करावा लागेल
मनसेकडून पाचो-यात खासदार संजय राऊत यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर बोलतांना ते म्हणाले की सभा रोखण्यासाठी असा प्रकार केला जात असेल तर भविष्यात तुमच्या सभा होतील तेव्हा आम्हाला देखील विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आव्हानाबाबत बोलतांना ते म्हणाले की, गुलाबराव पाटील यांचे दगड मारणारे हात राहिले नाही. ते खोक्यांनी केव्हाच भरले असल्याचा टोला त्यांनी लगावला.
गुलाबराव तुम्ही राजीनामा द्या संजय राऊत आव्हान स्विकारतील
गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्याबाबत बोलतांना दानवे म्हणाले की, शिवतीर्थ मैदानावर केलेले भाषण गुलाबराव पाटील यांनी एेकावे त्यानंतर बोलावे. आधी तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्यावा तुम्ही राजीनामा दिल्यानंतर संजय राऊतदेखील तुमचे आव्हान स्विकारतील असे दानवे यांनी सांगितले.
...तर सरकारने दखल घ्यावी...
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनासोबत पालकमंत्र्यांची असते. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. मात्र तेच जर दगडफेकीची भाषा करत असतील तर या प्रकाराची सरकारने व गृहविभागाने दखल घ्यावी अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.