CHB वरील प्राध्यापकांच्या मानधनातील वाढ तुटपंजी, प्रत्यक्षातील समस्याही वेगळ्याच
By अमित महाबळ | Published: April 2, 2023 07:41 PM2023-04-02T19:41:13+5:302023-04-02T19:41:52+5:30
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी, तास व तासिका यातील घोळ मिटवावा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होत्या.
अमित महाबळ
जळगाव : आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा गेल्या महिन्याच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर वाढीव मानधनाचा आदेश निघाला पण दररोज भडकणाऱ्या महागाईच्या तुलनेत मानधनातील वाढ तुटपुंजीच ठरत आहे. त्यामुळे एवढ्या कमी पैशात घर भागवून दाखवाच साहेब.. अशी विचारणा आता सीएचबीवर काम करणारे प्राध्यापक करत आहेत.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी, तास व तासिका यातील घोळ मिटवावा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होत्या. त्याआधारे शासनाने तासिका ६० मिनिटांची करण्यास मंजुरी दिली. तसेच मानधनात देखील वाढ केली आहे. मात्र, मानधन दर महिन्याला मिळायला हवे. कायम सेवेतील आणि सीएचबी प्राध्यापक यांना समान काम, समान फायदे व समान वेतन मिळावे, अशीही मागणी केली जात आहे.
तफावत दूर करा...
कागदावर असलेले व प्रत्यक्षात मिळणारे मानधन यामध्ये तफावत असते. अगदी कमी ठिकाणी मंजूर दरानुसार १०० टक्के मानधन मिळते, अशी माहिती काही प्राध्यापकांनी दिली.
कोणत्या अध्यापकांच्या माधनात किती वाढ?
अध्यापक - आधीचे - आताचे
कला, वाणिज्य, विज्ञान (पदवी) - ६२५-९००
कला, वाणिज्य, विज्ञान (पदव्युत्तर) - ७५०-१०००
प्रात्यक्षिके (पदवी) - २५० - ३५०
प्रात्यक्षिके (पदव्युत्तर) - ३०० - ४५०
विधी (पदवी/पदव्युत्तर) - ७५० - १०००
तासिका घेतल्या तरच मानधन...
सीएचबीवरील प्राध्यापकांना तासिका घेतल्या तरच मानधन मिळते. मानधनाच्या बिलासोबत सहायक संचालक (उच्च शिक्षण) हे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक मागवून घेतात. परीक्षा कालावधीत तासिका होत नाहीत हे गृहित धरून त्या दिवसातील तासिकांचे मानधन वजा केले जाऊन उर्वरित मानधन काढले जाते. सुट्या, परीक्षा व इतर कारणांमुळे खूपच कमी प्राध्यापकांच्या महिन्याला ३६ तासिका होतात. दरमहा १२,४०० ते ३२,६०० दरम्यान त्यांना मानधन मिळते.
या नियोजनात तासिका केव्हा घ्यायच्या?
वर्षाचे एकूण दिवस : ३६५ दिवस
उन्हाळी सुट्ट्या : ४५ दिवस
हिवाळी सुट्ट्या : २१ दिवस
एकूण रविवार : ५२ दिवस
राष्ट्रीय सण व उत्सव सुट्ट्या : २५
प्रवेश प्रक्रिया : ३० दिवस
महाविद्यालय/विद्यापीठीय स्पर्धा/कार्यक्रम (सर्व) : ३० दिवस
वरील वेळापत्रकानुसार एकूण २०३ दिवस सुट्ट्यांचे जातात. उरलेल्या १६२ दिवसात तासिका व परीक्षा होतात. निवड प्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात झाली तर संपूर्ण वर्षात १६२ दिवस (५ महिने १२ दिवस) सीएचबीधारकांना मानधन मिळू शकतात; जेवढा विलंब तेवढे दिवस कमी होतात. यामुळे सीएचबीधारकांना शासन निर्णयानुसार ९ महिने जरी नियुक्ती मिळत असली तरी ५ ते ६ महिनेच मानधन मिळते. उरलेले महिने विना वेतन/मानधन काम करावेच लागते, असेही प्रा. नितीन घोपे यांनी सांगितले.
दरमहा मानधन मिळायला हवे...
शासनाने तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली पण लेखी आणि प्रात्यक्षिके यामध्ये असलेली तफावत दूर करावी. नियमित प्राध्यापकांप्रमाणे तासिका तत्वावरील प्राध्यापकांना दरमहा मानधन मिळावे.
प्रा. नितीन घोपे, राज्य समन्वयक, शिक्षण क्रांती