कोळीबांधवांनी हाती घेतले अन्नत्यागाचे अस्त्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 07:14 PM2023-10-10T19:14:01+5:302023-10-10T19:14:13+5:30
विविध मागण्यांसाठी एकवटले : पाच जणांच्या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुंदन पाटील
जळगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोळी समाजातील पाच बांधवांनी मंगळवारी अन्नत्यागाचे अस्त्र हाती घेतले आहे.मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील समाजबांधवांनी सहभाग घेत अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता जगन्नाथ बाविस्कर, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर ,नितीन सपकाळे, पद्माकर कोळी यांनी वाल्मिकनगरातील आराध्य दैवत आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांना वंदन केले. त्यानंतर त्यांनी टॉवर चौक, महापालिका, स्वातंत्र्यचौकमार्गे पायी प्रवास करुन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारलेल्या मंडपात उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हाभरातून आंदोलनस्थळी दाखल झालेल्या जिल्हाभरातील मान्यवरांसह समाजबांधवांनी उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी अनेकांनी मागण्यांविषयी मार्गदर्शन केले आणि शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, असा आग्रह धरला.
आंदोलनस्थळी डॉ.शांताराम सोनवणे, प्रभाकर सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, अरुण इंगळे, डॉ.अश्विन सोनवणे, कैलास सोनवणे, अनील नन्नवरे, मुकेश सोनवणे, योगेश बाविस्कर, मंदा सोनवणे, मंगला कोळी, राहुल सोनवणे, ॲड.अमीत सोनवणे, ॲड.गणेश सोनवणे, संभाजी सोनवणे,संदीप कोळी, मन्नू सोनवणे, (जळगाव), जितेंद्र सपकाळे, पन्ना कोळी (भुसावळ), अशोक कांडेलकर (मुक्ताईनगर), डी.पी.साळुंखे (चोपडा), टायगर कोळी (जामनेर), हरलाल कोळी (रावेर) आदींनी भेट देत पाठिंबा दिला.
अशा आहेत मागण्या
विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी ढोर कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत, ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, जातपडताळणी समिती जळगाव जिल्हा करिता मंजूर आहे परंतु कार्यालय धुळे येथे आहे. कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे, आदिवासी कोळी समाजाच्या, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र महर्षि वाल्मीक ऋषी यांचे नावे महामंडळ स्थापन करावे, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती असावी, तथाकथित आदिवासी संघटनांचा हस्तक्षेप थांबवावा, बाहेरील राज्यातील रहिवास्यांच्या जात वैधता रद्द कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरु आहे.