जळगावात राष्ट्रवादीच्या पराभवाला नेतेच जबाबदार, जयंत पाटलांसमोरच बोलून दाखवली नाराजी

By अमित महाबळ | Published: March 28, 2023 03:56 PM2023-03-28T15:56:41+5:302023-03-28T15:57:26+5:30

गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा घेणे ही पक्षाची घोडचूक होती, असेही कार्यकर्त्यांनी सुनावले.

The leaders are responsible for the defeat of NCP in Jalgaon, expressed their displeasure in front of the state president jayant patil | जळगावात राष्ट्रवादीच्या पराभवाला नेतेच जबाबदार, जयंत पाटलांसमोरच बोलून दाखवली नाराजी

जळगावात राष्ट्रवादीच्या पराभवाला नेतेच जबाबदार, जयंत पाटलांसमोरच बोलून दाखवली नाराजी

googlenewsNext

अमित महाबळ

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकजूट नाही. वेगवेगळ्या दिशांना त्यांची तोंडे आहेत. दूध संघापाठोपाठ जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या हिताविरोधात गद्दारी झाली. वेळीच कारवाई झाली असती, तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील खदखद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर व्यक्त केली. गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा घेणे ही पक्षाची घोडचूक होती, असेही कार्यकर्त्यांनी सुनावले.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक मंगळवारी, पक्ष कार्यालयात झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दूध संघानंतर जिल्हा बँक निवडणुकीत पक्षाच्या हिताविरोधात काम केलेल्यांचा मुद्दा कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. अशा व्यक्ती मुंबईत येऊन नेत्यांकडून वाहव्वा मिळवतात. यामुळे कार्यकर्त्यांची मानसिक खच्चीकरण होत आहे. कोणी कसेही वागले तरी चालून येईल, असा चुकीचे संदेश जाऊ शकतो. त्यामुळे पक्षशिस्त मोडणाऱ्या व्यक्तींना पक्षात ठेवू नका, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.

...तर नामुष्की ओढवली नसती

दूध संघात जिल्ह्यातील नेत्यांनी हातमिळवणी केली. संजय पवार, दिलीप वाघ यांनी स्वत:साठी तडजोड केल्याचे पंकज महाजन म्हणाले. बाजार समितीच्या निवडणुका आहेत. हे नेते गुलाबराव पाटील व भाजपा यांच्याशी हातमिळवणी करू शकतात. दूध संघावेळी कारवाई झाली असती, तर जिल्हा बँकेत नामुष्की ओढवली नसती. नंतर अनेक कार्यकर्त्यांनी संजय पवार यांच्यासारख्या संधीसाधूंना बाजूला करा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली.

उमेदवार जाहीर करा...

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बूथ रचना मजबूत करण्याचे आवाहन केले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात बी टीम असेल, तर त्यांना शोधा. आपल्या सोबत घ्या, असे सांगितले. गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर यांच्यातील मतांच्या फरकावर देखील चर्चा झाली. विधानसभेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाने उमेदवारांची नावे लवकर जाहीर केल्यास त्यांना तयारीसाठी वेळ मिळेल, अशी सूचना गुलाबराव देवकर यांनी केली.

सकाळी प्रमुख नेते भेटले...

दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची आढावा बैठकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यामध्येही पक्षाच्या हिताविरोधात होत असलेले काम, अशा व्यक्तींवर होत नसलेली कारवाई आणि पक्षाच्या झालेल्या चुकांवर चर्चा झाल्याचे कळते. जयंत पाटील मुक्कामाला असलेल्या ठिकाणी ही बैठक झाली.

Web Title: The leaders are responsible for the defeat of NCP in Jalgaon, expressed their displeasure in front of the state president jayant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.