जळगाव दूध संघाला तीन वर्षांपासून दूध पुरवठा न करणाऱ्या संस्थांचे सभासदत्व रद्द होणार
By Ajay.patil | Published: September 24, 2023 07:05 PM2023-09-24T19:05:01+5:302023-09-24T19:05:14+5:30
जिल्हा दूध संघाच्या वार्षिक बैठकीत निर्णय : खासगी संस्थांना दूध पुरविणाऱ्या संस्थाही आता रडारवर
जळगाव - जिल्हा दूध संघाला सलग तीन वर्षांपासून दूध पुरवठा न करणाऱ्या संस्थाचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघाच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासह ज्या संस्था दूध संघाच्या सभासद आहेत, मात्र खासगी संस्थांना दुध पुरवठा करणाऱ्या संस्थावर देखील कारवाई करण्याचा निर्णय सभेत बहूमताने मंजूर करण्यात आला.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवारी शहरातील एका हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले होते. या सभेत चेअरमन मंगेश चव्हाण, संचालक गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, संजय पवार, दिलीप वाघ, मधुकर राणे, अरविंद देशमुख, रोहित निकम, प्रमोद पाटील, डॉ.पुनम पाटील, शामल झांबरे, नितीन चौधरी, स्मिता वाघ, कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे आदी उपस्थित होते. या सभेत ११ विषय सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या सर्व विषयांना सार्वनुमते मंजूरी देण्यात आली.
जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदाची लागणार संचालकपदी वर्णी
दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, येत्या काळात संघाचा कारभार अतिशय पारदर्शक पध्दतीने करण्याचा प्रयत्न राहणार असून, जे सभासद दूध संघाला सर्वात जास्त दूध पुरवठा करतील अशा सभासदांची दूध संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा मंगेश चव्हाण यांनी केली. तसेच यावेळी दूध संघाकडून विकास चहा पावडर १ ऑक्टोबरपासून विक्रीला येणार असल्याचीही घोषणा करत, चहा पावडरची लॉन्चींग देखील करण्यात आले.