‘महसुली’ कारवाईची ‘खबर’ फुटली, संशयितांच्या मोबाईलची निघतेय ‘कुंडली’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:06 PM2023-10-03T19:06:43+5:302023-10-03T19:07:19+5:30
फिरस्ती पथकांवर ‘वॉच’ ठेवणाऱ्या पहारेदारांच्या ५ दुचाकी जप्त
कुंदन पाटील
जळगाव : महसुल आणि पोलिसांच्या संयुक्त ४ पथकांनी जिल्ह्यात साध्या वाहनाद्वारे गस्त सुरु केली. मात्र गस्त घालणाऱ्या वाहनांमागे पहारेकऱ्यांच्या दुचाकी दिसताच या पथकांनी ‘यु टर्न’ घेत या म्होरक्यांचा पाठलाग सुरु केला. या पळवापळवीत ५ दुचाकी हाती लागल्या आहेत. साध्या वाहनात गेल्यावरही वाळूमाफियांना फिरस्ती पथकाविषयी माहिती मिळाली कुठून, याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आता प्रत्येक संशयितांच्या मोबाईलमधून ‘कुंडली’ बाहेर काढण्यात व्यस्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सोमवारी रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत वाळूमाफियांचा शोध घेण्यासाठी चार पथकांना सज्ज केले. त्यात परिविक्षाधीन जिल्हाधिकारी, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, ४ सशस्त्र व ६ साध्या वेशातील पोलिसांना पाचारण करण्यात आले. या पथकांवर अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी गस्त घालण्यासाठी चौफेर जबाबदारी दिली. त्यानुसार एक पथक चोपडा, दुसरे तापीकाठी, तिसरे गिरणाकाठी आणि चौथे पथक सातपुड्याच्यादिशेने रवाना झाले. मात्र चारही पथकांचा वाळूमाफियांचे पहारेकऱ्यांनी दुचाकीने पाठलाग सुरु केला. ही बाब पथकांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने ‘यु-टर्न’ घेतला.
पाठलाग सुरु केल्यावर पाच जणांनी दुचाकी सोडून पळ काढला. या दुचाकी ताब्यात घेत या पथकांनी थेट मध्यप्रदेशाची सीमा गाठली. पहाटे सहा वाजता भेटी दिलेल्या ‘स्पॉट’वरुन जिल्हाधिकाऱ्यांना ‘सेल्फी’ काढून पाठविली. तेव्हा कारवाईची ‘खबर’ कुणीतरी फोडल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यानुसार संशयितांच्या मोबाईलची ‘कुंडली’ काढली जात आहे.