जळगाव : पुढचे सहा दिवस तापमान हेलकावे खाणार! वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला
By अमित महाबळ | Published: April 22, 2023 06:45 PM2023-04-22T18:45:56+5:302023-04-22T18:46:04+5:30
तापमानात येत्या आठवड्यात चढ-ऊतार होणार असून, किमान व कमाल तापमान घटण्यासह आभ्राच्छादित वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जळगाव : तापमानात येत्या आठवड्यात चढ-ऊतार होणार असून, किमान व कमाल तापमान घटण्यासह आभ्राच्छादित वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
एप्रिल महिन्यातील कडक ऊन जळगावकरांना नकोसे झालेले असताना शनिवारी अचानक वातावरणाने रंग बदलले. दुपारनंतर आभाळ आले. जोरदार वारे वाहण्यासह पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर बराच वेळ उन्हाचा पत्ता नव्हता. हवामान खात्याच्या याआधीच्या अंदाजानुसार तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असल्याची शक्यता होती. मात्र, त्यामध्ये आता बदल झाला आहे. आयएमडीने शनिवारी दिलेल्या अंदाजानुसार, रविवारी निरभ्र आकाश राहील पण सोमवार ते बुधवार हे तीन दिवस अंशत: ढगाळ वातावरणासह गडगडाट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे पुढील दोन दिवस मात्र, आकाश निरभ्र राहील, असे म्हटले आहे.
तापमान घटणार
तापमानाने देखील यू टर्न घेतला आहे. पुढील सहा दिवसांत किमान व कमाल तापमान घटणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. किमान २२ तर कमाल ४१ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहू शकते. शनिवारी कमाल ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
विजेचा लपंडाव
शनिवारी दुपारी जोरदार वारे वाहू लागल्यानंतर विजेचा लपंडाव सुरू झाला. जिल्हापेठ व इतर भागात अनेकवेळा वीज ये-जा करत होती. वाऱ्यामुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडत होती. अक्षय्य तृतीयेची सुटी असल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी नव्हती. दुपारनंतर अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती.