डुक्कराला कळली गाढवाची चव! भरपाईच्या रकमेत पाचपटीने फरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2023 07:30 PM2023-05-06T19:30:59+5:302023-05-06T19:31:12+5:30
गाढवाच्या मृत्यूनंतर २० हजारांची भरपाई मिळणार असताना डुक्करासाठी मात्र फक्त ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे.
- कुंदन पाटील
जळगाव : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने २०२३ ते २०२५ पर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या जनावरांसाठी भरपाईची रक्कम निश्चित केली आहे. गाढवाच्या मृत्यूनंतर २० हजारांची भरपाई मिळणार असताना डुक्करासाठी मात्र फक्त ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. तर राज्य शासनाच्या या निकषांमध्ये कोंबडीही ‘पकपक’ करत शंभराचा भाव घेऊन बसली आहे.
राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीत जनावरे मृत्यूमुखी पडल्यास भरपाई देण्यासाठी आगामी तीन वर्षांसाठी संहिता केली आहे. विशिष्ट निकषाच्या आधारावर मदतीची रकम दिली जाणार आहे.त्यात म्हैस व गायीसाठी सर्वाधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ उंट, घोडा व बैलांना प्राधान्य दिले आहे. राज्य शासनाच्या मदतीच्या निकषात कोंबडीही जिंकली आहे. डुक्कर,मेंढी, बकरीसाठी मात्र ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. ही मदत मात्र उत्पादनक्षम जनावरांपुरतीच मर्यादीत राहणार आहे. दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी जनावरांच्या मृत्यूनंतर दिली जाणार मदत ही प्रतिकुटूंबानुसार निश्चीत केली जाणार आहे.
मासळीही दहा हजारांच्या जाळ्यात
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मत्सबीज शेतीसाठीही तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या मत्सबीज शेतीला प्रतिहेक्टर १० हजार रुपयांची नुकसान भरपाई करण्यात आली आहे. मात्र राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनेतून, अनुदानातून आणि मदतीतून मत्सबीज शेती करणाऱ्यांना लाभ मिळणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
माणसांपेक्षा जनावरे बरी...
या आपत्तीत दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीत संसार बुडाला असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास आणि घर पूर्णत: कोसळल्यास घरगुती भांडी आणि वस्तुंसाठी प्रतिकुटूंब ५ हजारांची मदत दिली जाणार आहे. त्यात नुकसानीपोटी व भांड्यांसाठी प्रत्येकी अडिच हजारांची तरतूद केली आहे. या मदतीचा आकडा पाहिल्यावर माणसांपेक्षा जनावरेच बरी म्हणावे लागत आहे.
जनावरांसाठी केलेली मदतीची तरतूद
रकम- जनावर
३७५००- म्हैस, गाय, उंट, याक
४०००- मेंढी, बकरी, डुक्कर
३२०००- उंट, घोडा, बैल
२००००- वासरु, गाढव, खेचर
१००- कोंबडी