कबुतर पकडायला गेला, जीव गमावून बसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 10:20 AM2022-04-12T10:20:34+5:302022-04-12T10:21:13+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता करण हा शेळगाव शिवारातील गिरीश सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी गेला. त्याच्या सोबत त्याचा भाचा तापीराम दामू भिल आणि पुतण्या सम्राट गोरख भिल दोघं होते.
जळगाव/नशिराबाद : कबुतर पकडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या करण ऊर्फ कालू चुडामण भिल (२४, रा. शेळगाव, ता. जळगाव) या तरुणाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शेळगाव येथे घडली. शनिवारी दुपारी करण विहिरीत पडला होता. रविवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला. तब्बल २४ तास मृतदेह विहिरीत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता करण हा शेळगाव शिवारातील गिरीश सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी गेला. त्याच्या सोबत त्याचा भाचा तापीराम दामू भिल आणि पुतण्या सम्राट गोरख भिल दोघं होते. विहिरीत कबुतरांचे घरटे असल्याने त्यांना पकडण्यासाठी करण विहिरीत उतरत असताना त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो २०० फूट खोल विहिरीतील पाण्यात पडला. करण विहिरी पडताच पुतण्या सम्राट याने घरी जाऊन कुटुंबाला माहिती दिली. पोलीसपाटील विलास पाटील व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
विहिरीतून त्याला काढण्याचा प्रयत्न झाला; परंतु तो गाळात रुतल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. रविवारी दुपारी नशिराबाद पोलिसांनी काही लोकांच्या मदतीने करणला बाहेर काढले खरे; पण तो मृत झाला होता. दुपारी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे व हवालदार राजेंद्र ठाकरे करीत आहे.