नारदाच्या गादीवर पाय ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षकांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:51 AM2022-04-29T10:51:37+5:302022-04-29T10:54:00+5:30
शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
जळगाव - एका कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाने दबंगगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घडला आहे. पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही, तर वारकरी संप्रदायात कीर्तनकार ज्या जागेवर उभे राहून विवेचन करतात, त्याला नारदाची गादी म्हटले जाते, पोलीस निरीक्षक महोदयांनी या मानाच्या गादीचाही अपमान केला. पायात बूट घालून ते गादीवर उभे राहिल्याने वारकरी संप्रदाय संतप्त झाला होता. याप्रकरणी आता पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.
शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सातव्या दिवशी सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तनसेवा होती. कीर्तन सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील हे त्याठिकाणी आले. त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून नियमावलीचे कारण देत वारकऱ्यांशी अरेरावी केली. ते एव्हढ्यावरच थांबले नाहीत. तर, त्यांनी वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. वारकरी संप्रदायाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यानंतर, पाटील यांनी अनावधानाने ही चूक घडल्याचे सांगत जाहीरपणे माफी मागतली आहे.
''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकर वाजविण्यात बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्देशाचे पालन व्हावे, यासाठी मी मंदिरात सुरू असेलल्या किर्तनाकडे गेलो होते. त्यावेळी, अंगावर वर्दी असल्याने पायतही बुट होते. मी माईककडे गेलो, त्यावेळी माझा पाय माईकच्या खाली असलेल्या असलेल्या नारदाच्या गादीवर पडला. या गादीचं महत्त्व किंवा ती नारदाची गादी आहे, हे माहिती नसल्याने कर्तव्य बजावत असताना माझ्याकडून गादीवर चुकून बुटासह पाय पडला. माझ्याकडून या अनावधानाने घडलेल्या कृत्याबद्दल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सध्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी छोटा स्पीकर लावला, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता चाळीसगावात पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केली. या दोन्ही घटनांमधून पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे, हे मात्र नक्की. दरम्यान, या प्रकरणात आता पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.