पाच लाखासाठी सोन्याची बाळी काढून घेणारा पोलिस निलंबित
By विजय.सैतवाल | Published: January 27, 2024 09:14 PM2024-01-27T21:14:18+5:302024-01-27T21:14:34+5:30
हद्द नसतानाही कारवाई करत पैशाची केली होती मागणी.
जळगाव : नेमणूक असलेल्या पोलिस ठाण्याची हद्द सोडून कट्टा बाळगणाऱ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेणारे अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची प्राथमिक चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे. याच प्रकरणातील महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी यांचा अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला आहे.
१० जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार लक्ष्मण शिंगाणे, पाळधी महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी हे हातेड, ता.चोपडा येथील दोन खासगी पंटरसह चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेले होते. तेथे शुभम प्रकाश सूर्यवंशी (रा. हातकणंगले, ता. कोल्हापूर) यास त्यांनी अडवले. त्याच्याकडे गावठी कट्टा मिळाल्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी केली होती. पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने सूर्यवंशीच्या कानातील सोन्याची बाळी या पोलिसांनी काढून घेतली होती. या संपूर्ण प्रकाराचा अहवाल पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आल्यानंतर शिंगाणे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली व कट्टा बाळगणाऱ्या सूर्यवंशी याच्या कानातून काढून घेतलेली बाळी शिंगाणे यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिली होती.
या प्रकरणात शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले असून अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी यांचा अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला आहे.
कर्मचारी निलंबित
कट्टा बाळगणाऱ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेण्यात आलेल्या प्रकरणात संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणातील महामार्ग पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्याचा अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला आहे.
- एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, जळगाव.