भाववाढ झाली दीडशेनं, तरी सोने खरेदी केली दिमाखानं; जळगाव सुवर्ण बाजारात प्रचंड उत्साह

By विलास बारी | Published: November 10, 2023 07:46 PM2023-11-10T19:46:41+5:302023-11-10T19:47:20+5:30

...दरम्यान, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात १५० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६० हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले, तर चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिली.

The price increased by 150 but Huge excitement in Jalgaon gold market | भाववाढ झाली दीडशेनं, तरी सोने खरेदी केली दिमाखानं; जळगाव सुवर्ण बाजारात प्रचंड उत्साह

भाववाढ झाली दीडशेनं, तरी सोने खरेदी केली दिमाखानं; जळगाव सुवर्ण बाजारात प्रचंड उत्साह

जळगाव : धनत्रयोदशीच्या एक दिवस अगोदर भावात घसरण झालेल्या सोन्याचा भाव धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाढला तरी खरेदीसाठी शुक्रवारी मोठा उत्साह दिसून आला. एकट्या सुवर्णनगरी जळगावात २० कोटींच्या पुढे उलाढात झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात १५० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६० हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले, तर चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिली.

साडेतीन मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसह सोने-चांदी खरेदीलाही मोठे महत्त्व दिले जाते. यासोबतच धनत्रयोदशीलादेखील सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने या दिवशी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. तो उत्साह यंदाही कायम राहिला.

ऐन मुहूर्तावर भाव वधारले
गेल्या चार दिवसांपासून सोने-चांदीचे भाव कमी होत गेले. त्यामुळे खरेदी वाढणार असल्याचा अंदाज होता. मात्र, शुक्रवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ झाली. तरीदेखील खरेदीवर कोणताही परिणाम जाणवला नाही. मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीला खरेदीचे प्रमाण अधिक वाढले असल्याचेदेखील सांगितले जात आहे. सध्या कलाकुसरीच्या दागिन्यांना अधिक पसंती असल्याने मनाजोगे दागिन्यांसाठी ग्राहकांकडून बुकिंगदेखील करून ठेवली गेली होती.

सर्वच प्रकारच्या अलंकारांना मागणी
शहरात सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून आली. धनत्रयोदशीला सोने खरेदी करायची असल्याने अनेकांनी जुन्या दागिन्यांची मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती दिली. या सोबतच अनेकांनी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवले. सुवर्णनगरी जळगावातील १७५च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी २० कोटींच्या वर पोहोचली असावी, असे सांगण्यात येत आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी मोठा प्रतिसाद मिळाला. जळगावात २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
- आकाश भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक

Web Title: The price increased by 150 but Huge excitement in Jalgaon gold market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.