लिंबू उत्पादकांनाही ढगाळ वातावरणाने पिळले; दर घसरले, अद्रक अन् वांगी महागली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 02:01 PM2023-04-09T14:01:01+5:302023-04-09T14:01:22+5:30
मार्चनंतर महागाईने तापणारा भाजीबाजारावर यंदा मात्र स्वस्ताईची सावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.
- कुंदन पाटील
जळगाव : ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण असल्याने लिंबूची मागणी ओसरली आहे. आवक वाढली असताना मागणी घटल्याने दीडशे रुपयांवर गेलेले लिंबू आता शंभर रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहेत. या महिन्यात लग्नसराई नसली तरी साखरपुड्यासह जाऊळ, ठिकठिकाणच्या यात्रोत्सवानिमित्त भंडाऱ्याचे कार्यक्रम होत असल्याने वांगीही तेजीत आली आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी कायम ठेवली आहे. एरव्ही मार्चनंतर महागाईने तापणारा भाजीबाजारावर यंदा मात्र स्वस्ताईची सावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.
वाग्यांना मागणी वाढली
सध्या जावळासह, साखरपुडा, यात्रोत्सवानिमित्त भंडारा, तसेच विविध सणावळीनिमित्त सार्वजनिक भोजनांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमांमध्ये वांग्याच्या भाजीला पसंती कायम असल्याने मागणी वाढली आहे. आपोआपच छोट्या वाग्यांच्या दरात प्रतिकिलोप्रमाणे दहा ते पंधरा रुपयांची तेजी आली आहे.
आद्रकही महागले
मार्चअखेरीस आद्रकचा हंगाम सरत येतो. त्यामुळे नव्या आद्रकाची आवक सध्या सुरु झालेली नाही. त्यामुळे आद्रकही १२० रुपये किलोंवर भिडले आहे.
लिंबूने उत्पादकांनाच पिळले
गेल्या महिन्यात दीडशे रुपये प्रतिकिलोवर लिंबूचे दर होते. तशातच नवा बहर आल्याने आणि ढगाळ वातावरणासह वादळ व अवकाळीचा फटका बसताच लिंबूची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली. मात्र ञस्वयंपाक घरासह व्यावसायिकांकडून लिंबूंची मागणी ओसरली.त्यामुळे लिंबू सध्या शंभर रुपयांवर आला आहे. गेल्या एप्रिल महिन्यात लिंबू दोनशे रुपयांवर पोहोचला होता.
भाजपाल्यांचे प्रतिकिलो दर
भाजी- दर
छोटी वांगी- ५० ते ६०
मोठी वांगी- ४०-५०
जाड मिरची- ४०-५०
बारिक मिरची- ५०-६०
भोपळा- ३०-३५
गवार- ८०-१००
भेंडी- ८०-९०
पालक (जुडी)- १५-२०
मेथी ६०-७०
फ्लॉवर- ४०-५०
आद्रक- १००-१२०
गिलके- ६०-७०
दोडके- ६०-७०