सटासट सटासट...; घरोघरी ‘ॲलर्जी’ची बाधा! व्हायरल नसल्याने औषधांचा उतारा फिका, डॉक्टरांची माहिती

By अमित महाबळ | Published: February 26, 2023 05:08 PM2023-02-26T17:08:17+5:302023-02-26T17:08:31+5:30

एकामागून एक सटासट-सटासट येणाऱ्या शिंका आणि खोकला यांमुळे जळगावकर बेजार झाले आहेत. यातून भयानक अंगदुखीही होत आहे.

The problem of allergy at home As there is no virus, prescription of medicines fades, according to doctors | सटासट सटासट...; घरोघरी ‘ॲलर्जी’ची बाधा! व्हायरल नसल्याने औषधांचा उतारा फिका, डॉक्टरांची माहिती

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

 जळगाव : शहरातील प्रदूषण, धूळ आणि वातावरणातील बदल यांमुळे जळगाव शहरात घरोघरी ‘ॲलर्जी’ची बाधा झाली आहे. एकामागून एक सटासट-सटासट येणाऱ्या शिंका आणि खोकला यांमुळे जळगावकर बेजार झाले आहेत. यातून भयानक अंगदुखीही होत आहे.

गेल्या महिन्यात जळगावमध्ये व्हायरल फिव्हरची मोठी साथ आली होती. सर्दी, खोकला व तापाचे असंख्य रुग्ण दिसून येत होते. त्यानंतर आता ॲलर्जिक सर्दी व खोकला जळगावकरांच्या मागे लागला आहे. दिवसा गरम आणि रात्री थंड वातावरणामुळे नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होत आहे. रस्त्यांच्या कामांमुळे जळगाव शहराची हवा प्रदूषित झाली आहे. धुळीचे प्रमाण वाढले आहे. व्हायरल असल्यास सर्दी व खोकल्याच्या सोबत ताप देखील असतो पण ॲलर्जी असल्यास ताप येत नाहीत. सध्या हेच रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. दवाखान्याच्या ओपीडीत येणारे १० पैकी आठ रुग्ण हेच आहेत. 

घरात शिरकाव झाला म्हणजे कठीणच 
घरात एकाला सर्दी व खोकला झाला म्हणजे त्याचा संसर्ग कुटुंबातील इतर सदस्यांना होणार हे नक्की असते. ॲलर्जीचा सर्दी व खोकला किमान आठ ते १० दिवस पाठ सोडत नाही. त्याला नमविण्यात औषधे फिक्की पडत आहेत.    

डॉक्टर म्हणतात...

हिवाळ्यातील थंड वातावरणात शरीरात कफ तयार होतो. हिवाळ्यात तो घट्ट असतो. उन्हाळ्याकडे वाटचाल होताना म्हणजे ऋतु बदलाच्या टप्प्यात रात्री थंड व दिवसा गरम वातावरणामुळे शरीरातील कफ पातळ होऊन सर्दी व खोकला होतो. वसंत ऋतूत वमन करावे, शक्य नसेल तर खूप थंड पाणी, दही व दूधाचे पदार्थ घेऊ नका. रात्री गरम पाणी प्या. घरगुती उपायांमध्ये क‌फ व खोकल्यावर सुंठ, वेखंड, हळद, गूळ व आले या गोष्टींचा वापर करा. उन्हात जाताना काळजी घ्या. एसी व थंड वारा टाळा. जेवताना पाणी प्या, दुपारी झोपू नका. ऋतू बदल होताना प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक असते. त्या दृष्टीने योग्य आहाराचे सेवन, व्यायाम यावर भर द्या. 

- श्रीरंग छापेकर, आयुर्वेदाचार्य

जळगाव शहरात प्रदूषण, रस्त्यांच्या कामामुळे धुळीचे प्रमाण खूप आहे. या धुळीमुळे ॲलर्जिक सर्दीचे रुग्ण अधिक संख्येने आढळून येत आहेत. धुळीचे प्रमाण कमी झाल्यावर सर्दीची रुग्णसंख्या उतरणीला लागलेली दिसेल. ॲलर्जिक व व्हायरलमध्ये फरक आहे. व्हायरलमध्ये सर्दी व खोकला यासोबत ताप देखील असतो मात्र, ॲलर्जिकमध्ये रुग्णाला ताप येत नाही. ॲलर्जिक सर्दी व खोकला ८ ते १० दिवस राहतो. औषधांचा फारसा परिणाम त्याच्यावर होत नाही. घरगुती उपायांमध्ये गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात, साधे पाणी गरम करून त्याची वाफ नाकातून घ्यावी. 

- डॉ. अविनाश महाजन, अधिष्ठाता, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय
 

Web Title: The problem of allergy at home As there is no virus, prescription of medicines fades, according to doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.