राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 02:48 PM2023-10-04T14:48:18+5:302023-10-04T14:48:40+5:30
तातडीने अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे निर्देश
कुंदन पाटील/जळगाव
जळगाव : राज्यातील सहकारी संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त मिळाला असून राज़्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने तातडीने अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यभरातील शेतकी संघ, वि.का.सोसायट्या, पगारदार संस्थांच्या निवडणुका पार पडण्याचे संकेत मिळत आहेत.
यासंदर्भात राज्यभरातील सहकार, साखर, दुग्ध, वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्तांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचीव वसंत पाटील यांनी मंगळवारी तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारुप व अंतिम मतदार याद्या ७ जून २०२३ पर्यंत प्रसिद्ध झाल्या असल्यास आणि त्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्यास दि.९ ऑक्टोंबरपासून निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात यावी. तर ज्या संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारुप याद्या ८ जून ते २१ ऑगस्टदरम्यान प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशा संस्थांमधील प्रारुप मतदार याद्या नव्याने तयार कराव्या
जळगावच्या ११ संस्था
राज़्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ११ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात ६ विविध कार्यकारी सोसायट्या, ४ पगारदार संस्था व एका शेतकी संघाचा समावेश आहे. त्यादृष्टीने जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्रक्रिया हाती घेतली असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.