जळगाव जिल्ह्यात ४०० पदांच्या भरतीची प्रक्रिया रद्द
By अमित महाबळ | Published: September 25, 2022 05:55 PM2022-09-25T17:55:57+5:302022-09-25T17:56:36+5:30
जळगाव जिल्ह्यात ४०० पदांच्या भरतीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
जळगाव: राज्य सरकारकडून आरोग्य विभागातील गट क आणि ड संवर्गाची भरती प्रक्रिया पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदमार्फत होणाऱ्या ४०० पदांच्या भरतीला खो बसला आहे. ही भरती यापुढे नेमकी केव्हा होईल हे अद्याप शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती; पण ऐनवेळी झालेल्या गोंधळामुळे सरकारला ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापुढे जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषद स्तरावर भरावीत, असा निर्णय झाला होता. या निर्णयामुळे जळगाव जि. प. मधील आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गांतील सुमारे ४०० पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. बिंदू नामावली तपासणीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आली होती. मात्र, अचानक शासनाने ही भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील परीक्षेच्या जाणून घ्या अटी
रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. नवीन जाहिरातीनुसार, नवीन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क व इतर अटी लागू राहतील, असे शासनाने आदेशात म्हटले आहे. मात्र, परीक्षा होईपर्यंत उमेदवार वाढत्या वयामुळे बाद होणार असल्यास त्यांच्याबाबत काय निर्णय असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही.