रिक्षाचालकांचा ‘ई-बस’ सेवेला विरोध! विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सुचविले पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 03:26 PM2023-11-01T15:26:41+5:302023-11-01T15:27:04+5:30
मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि विविध मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आवाहन केले.
जळगाव : ‘ई-बस’ सेवेमुळे रिक्षाचालकांच्या दैनंदिन जगण्यावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना आखण्यासाठी कल्याणकारी मंडळ गठित करावे, मुक्त रिक्षा परवाने बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी वीर सावरकर युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ॲटो रिक्षा संघटना संयुक्त समिती तसेच वीर सावरकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, ॲड.जमील देशपांडे, रज्जाक गनी मेमन, वाल्मिक सपकाळे, भानुदास गायकवाड, एकनाथ बारी, संजय पाटील, पोपट ढोभळे, भरत वाघ, शशिकांत जाधव, विलास ठाकूर, प्रल्हाद सोनवणे, प्रमेाद वाणी, राजू चौधरी, नाना शिवदे यांच्यासह विविध संघटनांच्या रिक्षाचालक व मालकांनी या मोर्चात सहभाग घेतला.
अशा आहेत मागण्या
मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि विविध मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आवाहन केले.त्यात यापूर्वीही शहर बससेवा फसगत झाली आहे. ई-बससेवेच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा आणू नये, रिक्षाचा खुला परवाना आणि खुला रिक्षा बॅज बंद करावा, २०१४ मध्ये तत्कालिन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना सादर केलेल्या अहवालानुसार रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, विम्यापोटी लूट थांबवावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.