‘मुख्यमंत्र्यांनी सल्ला न ऐकल्याने शिंदेंच्या गटात’, गुलाबराव पाटील यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:31 AM2022-06-23T09:31:53+5:302022-06-23T09:32:24+5:30
Gulabrao Patil : राज्यात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे.
जळगाव : राज्यात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. पक्षातील फूट टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली. मात्र,याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच सर्वच आमदारदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत गुलाबराव पाटील हे मुंबईलाच थांबून होते. मात्र, शिवसेनेकडून शिंदेचे बंड रोखण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने गुलाबराव पाटील यांनी देखील शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते गुवाहाटीला रवाना झाले.
फडणवीस, महाजन यांनीही साधला संपर्क
मंगळवारी रात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून, त्यांना शिंदे गटात सहभागी होण्याबाबतचा सल्ला दिला. स्वत: गुलाबराव पाटील यांनी देखील त्यास दुजोरा दिला आहे.
वेगळा गट नाही, आम्ही शिवसेनेत
गुलाबराव पाटील यांना आता गट स्थापन होणार की शिवसेनेत राहणार राहणार याबाबत विचारले असता, वेगळा गट स्थापन केला जाणार नसून शिवसेना म्हणूनच आम्ही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात सरकार झाल्यास शिवसेनेचा पाठींबा राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
आ. चंद्रकांत पाटील गुवाहाटीत
मुंबईहून रात्री मुक्ताईनगरात दाखल झालेले आ. चंद्रकांत पाटील हे बुधवारी दुपारी लागलीच चॉपर विमानाने मुंबईकडे रवाना झाले. आणि तिथून विमानाने गुवाहाटीला गेले आहेत. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट घालण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
अपक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार चंद्रकांत पाटील हे बुधवारी मुक्ताईनगरात होते. मात्र अचानक ते जळगाववरुन विमानाने मुंबईला व नंतर गुवाहाटीला रवाना झाले.
पाटील यांना खडसेविरोधक म्हणून पाठबळ आहे. मात्र राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर निवडून आणल्याने राजकीय वाटचाल खडतर होण्यापूर्वी त्यांनी गुवाहाटीचा मार्ग धरल्याचे बोलले जात आहे.