जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना
By अमित महाबळ | Published: August 30, 2022 05:59 PM2022-08-30T17:59:09+5:302022-08-30T18:00:59+5:30
म्हसावद स्टेशनपासून ८ किमी अंतरावर पद्मालय आहे. उंच-सखल पठारावर तलावाकाठी महादेव, मारुती व गणपतीची देवस्थाने आहेत.
जळगाव : देशात गणपतीची अडीच पिठे असून, अर्धा पीठ म्हणून जळगाव जिल्ह्यातील ‘पद्मालय’चा उल्लेख केला जातो. हे एक जागृत देवस्थान मानले जाते. त्यास धरणीधर क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. जळगाव शहरापासून हे ठिकाण सुमारे ३० किमी अंतरावर असून, श्रींच्या मूर्ती स्वयंभू मानल्या जातात.
म्हसावद स्टेशनपासून ८ किमी अंतरावर पद्मालय आहे. उंच-सखल पठारावर तलावाकाठी महादेव, मारुती व गणपतीची देवस्थाने आहेत. देशात गणपतीची अडीच पिठे असून, अर्धा पीठ म्हणून पद्मालयचा उल्लेख केला जातो. हे एक जागृत देवस्थान मानले जाते. यास धरणीधर क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणाविषयी गणेश पुराणात कथा आहे. म्हसावदकडून येताना डोंगरमाथ्याशी चढण (घाट) चढल्यावर गणेश मंदिराचा कळस दृष्टीस पडतो. आजूबाजूला भरपूर शेती आणि वन जमीन आहे. त्यामुळे पावसात निसर्ग पाहण्यासारखा असतो. संपूर्ण दगडी बांधणीतील पद्मालय मंदिर पूर्वाभिमुख, अतिशय भव्य व सुंदर आहे. मंदिराला लागूनच सभामंडप आहे. मंडपाच्या पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात गजाननाच्या दोन मूर्ती आहेत. त्या स्वयंभू मानल्या जातात. त्यातील एक उजव्या व दुसरी डाव्या सोंडेची आहे. मूर्ती पद्मालय तलावात सापडली असून, त्यांना चांदीचे मुकूट चढवले आहेत. प्रवाळातील मूर्ती आणि कमळाच्या फुलांनी भरलेला तलाव यासाठी देखील हे क्षेत्र ओळखले जाते. श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने आणि नित्यनेमाने येणारे अनेक भाविक आहेत.
सिद्ध पुरुषाचे वास्तव्य
मुख्य मंदिराच्या समोर गोविंद महाराजांच्या (गोविंदशास्त्री बर्वे) पादुका आहेत. त्यांच्या एका बाजूला, तलावाच्या काठावर महाद्वाराच्या अगदी समोर पंचधातूची प्रचंड मोठी घंटा बांधलेली आहे. तिचे वजन ४.५ क्विंटल आहे. ती वाजवली असता, पंधरा ते सोळा किमी परिसरात या घंटेचा आवाज ऐकू येतो. गोविंद महाराज या सिद्ध पुरुषाचे सन १९१५ ते १९३४ दरम्यान पद्मालय क्षेत्री वास्तव्य होते. त्यांनीच जुन्या देवळाचा जीर्णोद्धार करून नवीन सुंदर व भव्य देवालय बांधले.
पेशव्यांच्या काळात छत्रपती शाहूंतर्फे गावे
पद्मालय गजाननाच्या सेवेसाठी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शाहूंतर्फे १,८०० रुपयांच्या उत्पन्नाची गावे दिली होती. ब्रिटिश राजवटीत देवस्थानाला दरवर्षी शासकीय मदत मिळायची. शेतीपासून उत्पन्न मिळायचे, अशी नोंद जळगाव जिल्हा शासकीय गॅझेटिअरमध्ये आहे.
महाभारत काळाशी संदर्भ
मंदिराच्या बाहेर मोठे दगडी जाते ठेवलेले आहे. मंदिराराच्या मागे पाच किमी अंतरावर भीमकुंड येथे भीम व बकासूर युद्ध झाल्याचे मानतात. भीमकुंडात शंकराचे जुने मंदिर असून, मोठ्या पायासारखा खोलगट भाग तयार झालेला आहे. त्याला बकासुराचा पाय म्हणतात. परिसरात प्राचीन अवशेष आढळतात. आता, कुंडापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहन जाते.
अशा आठवणी
जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश जोशी महाराज यांनी मंदिराजवळील तलावात पूर्वी आंघोळ करता यायची. मुक्कामाची सोय होती. पद्मालय मंदिराचा जिर्णोद्धार केलेले गोविंद बर्वे महाराज यांची समाधी उनपदेवला आहे, अशी माहिती दिली. वावदडा येथील माऊली महाराज यांची पद्मालयच्या गजाननावर मोठी श्रद्धा होती. त्याच्या दर्शनासाठी ते रोज पद्मालयाला जायचे, असेही मंगेश जोशी महाराज यांनी सांगितले. एकाच ठिकाणी डाव्या आणि उजव्या सोंडेची मूर्ती असलेले पद्मालय हे क्षेत्र जगातील एकमेव आहे, अशी माहिती आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी दिली.
पद्मालयाचा असाही अर्थ
पद्मालय हा शब्द ‘पद्म’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांचा मिलाफ आहे. याचा संस्कृतमध्ये अर्थ कमळाचे घर, असा आहे. शासकीय गॅझेटिअरमध्ये मुखपाट (पद्मालय), असाही एक उल्लेख आढळतो. मात्र, त्याची माहिती मिळत नाही.