‘इएसआयसी’ रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित, केंद्रीय प्रशासनाकडे जाणार प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 06:00 PM2023-10-09T18:00:40+5:302023-10-09T18:01:25+5:30
वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या या रुग्णालयासाठी जागेअभावी अडचण निर्माण झाली होती.
- कुंदन पाटील
जळगाव : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्यावतीने (इएसआयसी) येथे १०० खाटांचा सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यासाठी एमआयडीसीतील खुला भूखंड-३ या जागेला ५ सदस्यीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे ५ एकर क्षेत्रात ही इमारती उभी राहणार आहे. त्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या केंद्रीय प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या या रुग्णालयासाठी जागेअभावी अडचण निर्माण झाली होती. तशातच एमआयडीसीने सुरुवातीला जागा देण्यास नकारही दिला होता. तेव्हा खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा केला आणि एमआयडीसीच्या ताब्यातील जमीन या रुग्णालयाच्या इमारतीसाठी उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार ५ जागांची पाहणी करण्यात आली होती.
भूखंड-३ ला संमती
रविवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे विभागीय संचालक ए.के.साहू, राज्य वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय कांबळे, कार्यकारी अभियंता अश्वीनकुमार, सहायक संचालक संदीपकुमार, सदस्य डॉ.सुहास फालक, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, तहसीलदार नामदेव पाटील, शाखा प्रबंधक चंदन नारखेडे, लिपीक मयूर बाविस्कर यांनी एमआयडीसीतील जागेची पाहणी केली. या प्रशस्त जागेतून पाच एकर जागा या रुग्णालयासाठी वर्ग करण्यासाठी समितीने मान्यता दिली.
केंद्राकडे प्रस्ताव जाणार
दरम्यान, राज्य समितीचा अहवाल केंद्रीय प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. त्याठिकाणी मंजूरी मिळाल्यावर एमआयडीसीला जागा हस्तांतरित करण्याच्या सूचना त्यांच्या विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यापोटी जिल्हा प्रशासनाच्यावतीने खुला भूखंड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या जागेवर असलेल्या झाडांना मूळासकट सुरक्षितपणे बाहेर काढून अन्यत्र त्यांचे रोपण करण्यात येईल. तसेच विद्युत पोलही हलविण्यात येणार आहे. एमआयडीला खुला भूखंड उपलब्धही करुन देण्यात येईल.कामगारांच्या आरोग्यासाठी सुविधायुक्त रुग्णालय उभे राहावे, हाच प्रशासनाचा प्रयत्न आहे.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.