वादळाचा धुमाकूळ, झाडे पडून वीजपुरवठा खंडित!
By अमित महाबळ | Published: June 4, 2023 08:02 PM2023-06-04T20:02:53+5:302023-06-04T20:03:36+5:30
रविवारी दुपारी आलेल्या वादळामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडली.
जळगाव : वादळामुळे वीज वाहिन्यांवर झाडे पडून रविवारी, जळगाव शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. ग्रामीण भागात विजेचे खांब वाकले असून, वीज तारा खाली आल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार २५ पेक्षा अधिक ठिकाणी वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे.
रविवारी दुपारी आलेल्या वादळामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडली. त्यामुळे वीज वाहिन्या तुटण्यासह त्यांचे खांब देखील वाकले होते. खेडी, जिल्हा पेठ, शिव कॉलनी, आदर्शनगर, गणपतीनगर, शिवाजीनगर, रामदास कॉलनीसह शहराच्या इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे वीज उपकेंद्रापर्यंच्या ३३ केव्ही मुख्य वाहिन्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे मेहरुण, रिंगरोड, गिरणा पंपिंग, हुडको या उपकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या भागात बराच वेळ वीजपुरवठा खंडित होता.
२५ ठिकाणी नुकसान
जळगाव तालुक्यात देखील वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव शहरात किमान २५ ठिकाणी झाडे व फांद्या तुटून पडल्याने वीज खांब व तारांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निश्चित आकडेवारी सोमवारपर्यंत स्पष्ट होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या ठिकाणी पडली झाडे
रामेश्वर कॉलनी हनुमान मंदिराशेजारी, मू. जे. महाविद्यालयासमोर, शिव कॉलनी गट क्रमांक ५७, रामदास कॉलनी यासह शहराच्या अनेक भागात झाडे व फांद्या तुटून वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे. महावितरणने मान्सून पूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली होती, त्यापूर्वीच वादळ धुमाकूळ घालून गेले आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
वीजपुरवठा खंडित झाल्याने नियोजित पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार होऊ शकला नाही. तो उशिराने झाला. विजेअभावी घरातील पंखे, कूलर, एसी बंद होते. उकाडा व घामामुळे जळगावकर त्रस्त झाले होते.