मुलगा मंत्री झाला, तरीही आईचा एसटीनेच प्रवास...; सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 06:42 AM2023-07-04T06:42:31+5:302023-07-04T06:42:46+5:30
अनिल पाटील यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते.
-संजय पाटील
अमळनेर (जि. जळगाव) : रविवारी अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील यांनी आपला साधेपणा सोडला नाही. एसटी बसने त्या सोमवारी सकाळी अमळनेरहून हिंगोणे (ता. अमळनेर) या गावी शेतात पोहोचल्या. आधीपासूनचा त्यांचा साधेपणा मुलाला पद मिळाल्यानंतरही बदललेला नाही.
अनिल पाटील यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. तेव्हाही घरात चारचाकी आणि आज चार चारचाकी आहे; मात्र अनिल पाटील यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील ह्या नियमितपणे आपल्या मूळ हिंगोणे गावी शेती करायला जातात. विशेष म्हणजे त्या नेहमी ‘लालपरी’ने गावी जातात आणि परत येतात. पाटील यांच्या परिवारातील सदस्य सोमवारी मुंबईला रवाना झाले. पुष्पाबाईंनी मात्र सकाळीच बसस्थानकात जाऊन एसटीने हिंगोणे गाठले.
मंत्री अनिल पाटील यांच्या आई आपल्यासोबत बसने प्रवास करत आहेत, म्हणून वाहक मनोज पाटील यांनी साधेपणाचा हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपला. पुष्पाबाईंनी हिंगोण्यातील ग्रामदेवतेला पेढे वाहिले. शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. शरीरात प्राण आहे तोपर्यंत ज्याने-त्याने आपापली कामे करत राहावी, असे सांगून त्यांनी जनतेच्या अपेक्षा वाढल्याने मुलाने त्या पूर्ण कराव्यात आणि कुलदेवतेने त्याला बळ द्यावे, अशी प्रार्थना केल्याचे त्या म्हणाल्या.अनिल पाटील यांच्या वहिनी राजश्री पाटील याही सासूसोबत शेतावर जात असतात. नवनवीन प्रयोग करून शेतीत बदल घडवितात आणि सरपंच या नात्याने गावचा कारभारदेखील सांभाळतात.