बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:03 PM2024-05-23T15:03:08+5:302024-05-23T15:04:08+5:30
चार जणांचा बळी घेणारे संशयित ताब्यात. संशयितांमध्ये बिल्डर आणि राजकारण्याच्या मुलाचा समावेश असल्याने उशिराने कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चार जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांमध्ये बिल्डर आणि राजकारण्याच्या मुलाचा समावेश असल्याने उशिराने कारवाई करण्यात आली आहे.
घटनेच्या 17 व्या दिवशी जळगाव पोलिसांनी बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार याला ताब्यात घेतले आहे. दोघांवर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना घेऊन पोलीस जळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत.
या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा होती. पण लोकमतने केलेल्या पाठपुराव्यामुळे पोलिसांना अखेर कारवाई करावी लागली. पुण्यात बिल्डरच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने दोन युवा अभियंत्यांना चिरडल्याच्या घटनेची खुद्द उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पुण्यात येऊन पोलिस यंत्रणेची बैठक घेत घटनेचा आढावा घेतला. तेथे तत्काळ आरोपीला अटक झाली. जळगाव तालुक्यातील रामदेववाडीत मात्र अशाच एका घटनेत चारजणांचा जीव जाऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नव्हती. पुण्यात वेगळा न्याय आणि रामदेववाडीत वेगळा का? अशा संतप्त भावना गावकऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या होत्या.
रामदेववाडीतील घटनेनंतर वाहनातील जखमी तरुणांना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अर्णव अभिषेक कौल याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईला नेले होते. अखिलेश संजय पवार याचे जळगावात रक्ताचे नमुने घेण्यात आले, तर अर्णवला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पारोळ्यात थांबवून तेथे रक्ताचे नमुने घेण्यात आले. दोघेही मुंबईत उपचार घेत होते.
‘लोकमत’मध्ये बुधवारी प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तडकाफडकी तपास अधिकारी बदलला. या घटनेत अर्णव अभिषेक कौल हा कार चालवीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती डीवायएसपी संदीप गावित यांनी ‘लोकमत’ला दिली.