कथा जळगावमधील अखंड काळ्या पाषाणातील गणेशमूर्तीची..; देशात केवळ २ ठिकाणीच आढळली

By अमित महाबळ | Published: September 19, 2023 06:42 AM2023-09-19T06:42:03+5:302023-09-19T06:43:17+5:30

असे म्हणतात की, उत्तराखंडनंतर केवळ जळगावातच विशिष्ट बैठकीची गणेशमूर्ती!

The story of Ganesh idol in black rock in Jalgaon..; Found in only 2 places in the country | कथा जळगावमधील अखंड काळ्या पाषाणातील गणेशमूर्तीची..; देशात केवळ २ ठिकाणीच आढळली

कथा जळगावमधील अखंड काळ्या पाषाणातील गणेशमूर्तीची..; देशात केवळ २ ठिकाणीच आढळली

googlenewsNext

जळगाव - अहाहा.. वर्णन ते काय करावे... मुखकमलाचे दर्शन घडताच नजर खिळून राहावी... सालंकृत.. सुबक.. आखीव-रेखीव. देशात केवळ दोनच आणि त्यापैकी एक जळगावात.. ही सर्व माहिती आहे ती १८७ वर्षांचा ज्ञात इतिहास असलेल्या अखंड काळ्या पाषाणातील गणेशमूर्तीची. विशिष्ठ पद्धतीने बसलेली मूर्ती उत्तराखंडसह केवळ महाराष्ट्रातील जळगाव शहरात असल्याचे म्हटले जाते.

केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या पिंप्राळ्यातील निवासस्थानी ही मूर्ती आहे. घरातील एका खोलीत स्वतंत्र देवघर तयार करून त्यात ठेवली आहे. मुंबई, पुणे, मलकापूर, चिखली, बुलडाणा येथून अनेकजण दर्शनासाठी येतात. या गणेशासमोर मनापासून जे मागाल ते पूर्ण होते, असे या सर्वांचे अनुभव असल्याचे वडोदकर सांगतात. शशिकांत दिनकर वडोदकर यांना १८३६ पासून या मूर्तीचा इतिहास माहीत आहे. तोही त्यांच्या वडिलांनी सांगितलेला. त्यांचे पणजोबा गणेश वडोदकर हे वढोदा गावी असताना तेथील मंदिरात ही मूर्ती होती. नंतर हे कुटुंब मलकापूरला आल्यावर गणपतीची मूर्तीही या ठिकाणी आणण्यात आली. बरीच वर्षे तेथे राहिल्यानंतर दोनच वर्षांपूर्वी जळगावमध्ये आली आहे.

बाहेरून दिसे पाच फूट; पण होती पावणेदोन फूट उंच

मलकापूरला असताना १९८८ मध्ये मूर्तीवरील शेंदुराची खोळ निघाली. शेंदूर पूर्ण काढल्यानंतर मूर्तीचे मूळ रूप समोर आले. वर्षानुवर्षे शेंदूर लावल्याने उंची पाच फूट झाली होती, तर आत पावणेदोन फुटांची मूर्ती होती. शेंदूर पूर्णपणे दूर करून मूर्ती मूळ रूपात आणण्यात आली.

ऑगस्ट २०२१ मध्ये मूर्ती जळगावला आणल्यावर तिच्यावर शेंदूर लावणे बंद केले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पुनर्प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्तीला शास्त्रोक्त पद्धतीने वज्रलेप करून अधिक सुरक्षित केले जाणार आहे.

गणेशोत्सवात रचतात पार

मूर्तीला दर पंधरा दिवसांनी चमेलीचे तेल लावल्याने काळा पाषाण कोरडा पडून त्याला ठिसूळपणा येत नाही. दिवाळीत उटणे लावून आंघोळ घातली जाते. नवीन वस्त्र आधी गणपतीला, मग इतरांना आणले जाते. गणेशोत्सवात द्वादशीला गणपतीला पार केला जातो. मोदक व करंज्या सोंडेपर्यंत रचल्या जातात. नंतर त्यांचे प्रसाद म्हणून वाटप होते.

मूर्तीच्या बेंबीत होता हिरा.... 

सर्वसामान्यपणे गणेशमूर्तीचा एक हात आशीर्वाद देतानाच्या स्थितीत असतो. मात्र, या मूर्तीचा एक हात मांडीवर ठेवलेला आहे, तर बाकीच्या हातांमध्ये परशू, मोदक व नाग धरलेला आहे. अशा बैठकीची आणखी एक मूर्ती उत्तराखंडमध्ये आहे. आतापर्यंत मला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार इतरत्र अशी मूर्ती नाही. या मूर्तीच्या बेंबीत सुरुवातीला एक हिरा बसवलेला होता, असेही वडिलांकडून ऐकायला मिळाले होते, असे शशिकांत वडोदकर यांनी सांगितले.

Web Title: The story of Ganesh idol in black rock in Jalgaon..; Found in only 2 places in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.