कूलरसह सिलिंडर लांबविणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या! एमआयडीसी पोलिसांची कारवाई
By विलास.बारी | Published: April 17, 2023 04:54 PM2023-04-17T16:54:17+5:302023-04-17T16:54:43+5:30
कुसुंबा शिवारातील विशाल कूलर फॅक्टरीमधून चार कूलर आणि एक गॅस सिलिंडर लांबविणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जळगाव : कुसुंबा शिवारातील विशाल कूलर फॅक्टरीमधून चार कूलर आणि एक गॅस सिलिंडर लांबविणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळून चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अयोध्या नगरातील विशाल ढवळे यांच्या कुसुंबा शिवारात विशाल कूलर या फॅक्टरीमधून गुरुवार, १३ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार कूलर आणि एक गॅस सिलेंडर चोरून नेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
रात्री तिघांना अटक
दरम्यान, या चोरीच्या गुन्ह्यामध्ये धनराज अवदेश पासवान (१९), विपुल प्रकाश पाटील (२२), निखिल उत्तम धनगर (१९, सर्व रा. कुसुंबा) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. रविवारी रात्री तिघांना एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १४ हजार रुपये किमतीचे चार कूलर व दीड हजार रुपये किमतीचे गॅस सिलिंडर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, विशाल कोळी, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी केली आहे.