विद्यापीठ दोन कारणांसाठी महाविद्यालयातील प्रवेश रोखणार

By अमित महाबळ | Published: June 19, 2023 06:46 PM2023-06-19T18:46:20+5:302023-06-19T18:47:14+5:30

शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी प्रवेश देणे सुरू झाले आहे.

The university will block admission to the college for two reasons | विद्यापीठ दोन कारणांसाठी महाविद्यालयातील प्रवेश रोखणार

विद्यापीठ दोन कारणांसाठी महाविद्यालयातील प्रवेश रोखणार

googlenewsNext

जळगाव : पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिक्षकांची नियुक्ती करण्यासह नॅक मूल्यांकनाच्या संदर्भात आवश्यक पूर्तता जून महिन्यात करून न घेतल्यास संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखण्याची कारवाई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करू शकते. या आशयाचे पत्र सर्वच महाविद्यालयांना बजावण्यात आले आहे.

शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी प्रवेश देणे सुरू झाले आहे. परंतु, काही महाविद्यालयात विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक नियुक्त नाहीत. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार नॅक संदर्भात कार्यवाही केली नसल्याचेही समोर आले होते. त्यामुळे या दोन्हींची पूर्तता जून महिन्यात करून घेण्यास महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.

विद्यापीठाशी संलग्न कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व समाजकार्य महाविद्यालयात अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अध्यापनासाठी, प्रत्येक विषयाकरिता परिनियम ४१५ (१) नुसार कमीत कमी २ शिक्षक किंवा एकूण मान्यतेच्या ५० टक्के पदे भरणे महाविद्यालयांना बंधनकारक आहे. ही नियुक्ती न केल्यास महाविद्यालयांना पदव्युत्तर विषयाच्या कोणत्याही विषयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाहीत. विद्यापीठाने शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे.

ज्या महाविद्यालयांनी आयआयक्यूए रिपोर्ट (इन्स्टिट्यूशनल इन्फॉर्मेशन फॉर क्वॉलिटी असेसमेंट) नॅक कार्यालयाला सादर केलेला नाही आणि ज्यांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, मानांकन झालेले नाही अशा महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असे त्यांना कळविण्यात आले आहे. यानंतर महाविद्यालयांनी आयआयक्यूए सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जून महिन्याच्या मुदतीनंतर शिक्षक नियुक्ती व नॅक अनुषंगाने पूर्तता न केलेल्या महाविद्यालयांवर पुढील कारवाईचा निर्णय विद्यापीठाची समिती घेणार आहे.

समितीच्या निर्णयानुसार कारवाई

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परिनियम ४१५ (१) नुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यासह नॅकच्या अनुषंगाने आवश्यक त्या पूर्तता करून घेण्यास महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. त्यासाठी जून महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यापीठाची समिती पुढील कारवाईचा जो निर्णय घेईल तो संबंधित महाविद्यालयांना लागू होईल. विहित मुदतीत शिक्षकांची नियुक्ती व नॅक संदर्भात पूर्तता न केल्यास विद्यापीठाच्या पूर्व परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असे महाविद्यालयांना कळविले आहे, अशी माहिती कबचौउमविचे  प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी दिली.

Web Title: The university will block admission to the college for two reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.