धावत्या बसचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ८० प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 03:48 PM2023-11-13T15:48:17+5:302023-11-13T15:48:51+5:30

बसचालक डी. एम. सोळंके यांनी प्रसंगावधान राखत वेगात असणाऱ्या बसवर नियंत्रण मिळविले आणि बस रस्त्याच्या कडेला घेतली.

The wheel of the running bus came off; 80 passengers are safe due to the accident of the driver | धावत्या बसचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ८० प्रवासी सुखरूप

धावत्या बसचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ८० प्रवासी सुखरूप

मनोज जोशी

पहूर (जि. जळगाव) : छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या बसचे पुढील चाक अचानक निखळले. चालकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला घेतली. यामुळे बसमधील ८० प्रवासी सुखरूप बचावले आहेत. ही थरारक घटना जळगाव - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूर ता. जामनेरनजीक सोमवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, क्र. एम. एच. २०, बीएल- २४२० ही बस छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे जात होती. पहूरपासून एक किलोमीटर अंतरावर बस होती. त्याचवेळी बसचे पुढचे चाक निखळले आणि ते चाक तब्बल दीडशे मीटर अंतरावर एका शेतात गेले.

बसचालक डी. एम. सोळंके यांनी प्रसंगावधान राखत वेगात असणाऱ्या बसवर नियंत्रण मिळविले आणि बस रस्त्याच्या कडेला घेतली. यावेळी बसमध्ये जवळपास ८० प्रवासी होते. बसमधील प्रवाशांची आरडाओरड ऐकून समोरच असलेल्या शेतातील शेतकरी कैलास पांढरे घटनास्थळी दाखल झाले. चालकासह वाहक व पांढरे यांनी प्रवाशांना बसमधून उतरविले आणि सुरक्षितस्थळी हलविले. त्यावेळी घाबरलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अचानक टायर निखळल्याने मोठा आवाज झाला. बसवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून बस रस्त्याच्या कडेला घेतली. याची माहिती वरिष्ठांना दिली आहे.
-  डी. एम. सोळंके, बसचालक, जळगाव आगार.

Web Title: The wheel of the running bus came off; 80 passengers are safe due to the accident of the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव