कोळी समाजाच्या महिलांनी शासनाला दिला साडी-चोळी, बांगड्यांचा आहेर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 04:03 PM2023-10-25T16:03:37+5:302023-10-25T16:03:44+5:30
आदिवासी कोळी समाजावर हेतूपुरस्सर अन्याय केला जात असून, उपोषणकर्त्यांना न्याय देऊन कोळी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
भूषण श्रीखंडे
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू असून, बुधवारी इंदुबाई बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे साडी, चोळी, बांगड्या व निवेदन देऊन आदिवासी कोळी समाजातर्फे राज्य सरकारला आहेर देण्यात आला.
आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरपासून आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी २५ रोजी, इंदुबाई बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन तसेच राज्य सरकारला साडी-चोळी व बांगड्यांचा आहेर देण्यात आला. प्रा. भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे, बबलू सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला मिळावा. अनेक आदिवासी कोळी समाजबांधवांना जातवैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, ते आता का देण्यात येत नाही. राष्ट्रपतींचा अध्यादेश कलम ३८.२ अन्वये शेड्यूल ट्राईब मोडिफिकेशन लिस्ट १९५० नुसार अनुसूचित जमातीमध्ये आमची जमात नेमून दिलेली आहे. तसेच प्रथमदर्शनी पुरावा पाहून तत्काळ अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे तरीही आदिवासी कोळी समाजावर हेतूपुरस्सर अन्याय केला जात असून, उपोषणकर्त्यांना न्याय देऊन कोळी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.