‘नूतन मराठा’च्या महिला पथकाने फोडली युवाशक्तीची दहीहंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 10:46 PM2023-09-07T22:46:33+5:302023-09-07T22:48:13+5:30
‘चंद्रयान-३’ची दहीहंडीवर आकर्षक सजावट
भूषण श्रीखंडे
जळगाव : ढोल-ताशांचा गजर अन् रोप व मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके तसेच ‘गोविंदा रे गोपाळाच्या...’ जयघोषात महिला गोविंदा पथकाने एकावर एक थर लावत तरुणाईची मानाची दहीहंडी फोडली. महिलांची मानाची दहीहंडी नूतन मराठा महाविद्यालयाच्या एनसीसीच्या महिला पथकाने फोडली.
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे काव्यरत्नावली चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समूहाचे संचालक अतुल जैन, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, शिवसेना सहसंपर्कप्रमुख संजय सावंत, एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अभिजीत महाजन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, विराज कावडिया उपस्थित होते. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाउंडेशन दहीहंडी उत्सवाच्या अध्यक्ष संस्कृती नेवे, उपाध्यक्ष मेघना भोळे, सचिव पियुष तिवारी, सहसचिव हर्षल मुंडे, खजिनदार अर्जुन भारूळे आदींनी सहकार्य केले.
मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक
विवेकानंद व्यायामशाळेतर्फे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यासह शिवतांडव व शौर्यवीर या दोन्ही ढोल-ताशा पथकांतील सुमारे २७५ ढोल-ताशा वादकांनी आपली कलाकृती सादर केली. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थ्यांनी रोप मल्लखांब, पोल मल्लखांबचे चित्तथरारक सादरीकरण करून जळगावकरांची मने जिंकली.
नृत्य, राधा-कृष्ण वेषभूषा स्पर्धा
महिलांच्या दहीहंडीत अनुभूती शाळा, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, रूस्तमजी इंटरनॅशनल, किडस् गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, इपिक डान्स स्टुडिओतर्फे सांस्कृतिक नृत्य सादर केले. ५ ते १२ वर्ष वयोगटातील बालगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञांना सलाम
‘चंद्रयान-३’ या यशस्वी मोहिमेत सहभागी इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ ‘त्या नाहीतर कोण...’ ही थिम घेऊन दहीहंडीत विशेष मानाचे स्थान देण्यात आले होते. दहीहंडीवर चंद्राची प्रतिकृती साकारून महिला शास्त्रज्ञांची प्रेरणादायी छायाचित्रे लावण्यात आली होती.