औरंगाबाद मार्गावर धावत्या ट्रॅव्हल्समधून प्रवाशांच्या साहित्याची होतेय चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:47 PM2019-09-20T12:47:24+5:302019-09-20T12:47:53+5:30
रस्त्याची दुरवस्था चोरट्यांच्या पथ्यावर, वाहनांच्या कमी वेगामुळे डिक्कीचे कुलूप तोडून दोन दिवसात आठ प्रवाशांचे साहित्य लंपास
जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गाच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या सर्वच वाहनांसह ट्रॅव्हल्सचाही वेग कमी होत असल्याने त्याचा फायदा घेत ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचे कुलूप तोडून प्रवाशांच्या बॅगा व इतर साहित्याची चोरी होण्याचे प्रकार दररोज वाढत आहे. यामुळे प्रवाशांना विनाकारण भूर्दंड सहन करावा लागत असून ट्रॅव्हल्स चालक-मालक व प्रवाशांमध्ये वादही होत आहेत. दोन दिवसात आठ प्रवाशांच्या बॅगा, इतर घरगुती साहित्य तसेच लहान मुलांच्या सायकल चोरीस गेल्या आहेत. या प्रकरणी ट्रॅव्हल्स मालकांकडून पोलिसांकडे तक्रारही करण्यात आल्या आहेत.
जळगाव-औरंगाबाद मार्गाच्या चौपदरीकरणासाठी थेट औरंगाबादपर्यंत रस्ता खोदून ठेवल्याने या मार्गाने प्रवास करणे जिकरीचे होत आहे. सोबतच वेगवेगळ््या व्यापार-व्यवसायावरही परिणाम झाला आहे. वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढल्याने अनेक जण जळगावहून अजिंठा, सिल्लोडमार्गे औरंगाबादला न जाता धुळे व चाळीसगावमार्गे जाणे पसंत करीत आहे. यामध्ये पुणे येथे जाणाºया अनेक ट्रॅव्हल्सही धुळे, मालेगावमार्गे पुण्याला जात आहे. मात्र ज्या ट्रॅव्हल्स औरंगाबादमार्गे पुण्याकडे जात आहेत, त्या ट्रॅव्हल्सला दुरुस्तीच्या खर्चासोबतच साहित्य चोरीचाही भूर्दंड सहन करावा लागत आहे.
ट्रॅव्हल्सचा वेग कमी होताच तोडले जाते कुलूप
जळगावहून ट्रॅव्हल्स निघाल्यानंतर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अजिंठानजीक जेवणासाठी थांबतात. तेथे काही जण पाळत ठेवून या ट्रॅव्हल्स पुढे मार्गस्थ झाल्या की त्यांचा पाठलाग करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. रस्त्यावर दोन-दोन फुटाच्या अंतरावर मोठ-मोठ खड्डे असल्याने ट्रॅव्हल्सचा वेग कमी होतो. या दरम्यान ट्रॅव्हल्सच्या डिक्कीच्या कुलुपाला लोखंडी आकोडा बांधला जातो व ट्रॅवेल्स पुढे गेली की डिक्कीचे कुलूप व कडीही तुटते. पुढील खड्ड्यात ट्रॅव्हल्सचा वेग पुन्हा कमी झाला की मागे असलेल्या चारचाकीमधील व्यक्तींकडून बॅगा व इतर साहित्य काढण्यात येत आहे. ज्या वेळी प्रवाशांना उतरायचे असते तेथे डिक्कीजवळ आल्यानंतर हा प्रकार लक्षात येत आहे.
दोन दिवसात आठ जणांना फटका
दोन दिवसात दोन वेगवेगळ््या ट्रॅव्हल्समधून आठ जणांचे साहित्य चोरीस गेले आहे. यामध्ये बुधवारी रात्री जळगावातील एका ट्रॅव्हल्समधून प्रणिता महाजन, अर्चना खडके, कलाबाई पाटील, गायत्री महाजन व चिरमाडे नामक एक प्रवासी अशा पाच जणांच्या बॅगा, लहान मुलाची सायकल, घरगुती साहित्य डिक्कीतून लांबविले. औरंगाबादला पोहचल्यानंतर प्रवासी उतरत असताना हा प्रकास लक्षात आला.
हा प्रकार घडण्याच्या एक दिवस अगोदर मंगळवारी रात्री दुसºया एका ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतूनही तीन जणांचे साहित्य लंपास करण्यात आले. बुधवारी रात्री पुन्हा याच कंपनीच्या ट्रॅव्हल्समधून साहित्य चोरीचा प्रयत्न सुरू असताना मागून येणाºया एका रिक्षा चालकाने ट्रॅव्हल्स चालकाला हा प्रकार सांगितला व चोरी टळली.
ट्रॅव्हल्सला विलंब
चोरीच्या या घटनांमुळे प्रवाशी संतप्त होत असून त्यातून वादही होत आहेत. याप्रकारात ट्रॅव्हल्स बराच वेळ थांबत असल्याने त्या पुणे येथे पोहचण्यास दररोज विलंब होत आहे. बुधवारी चोरीचा प्रकार घडल्यानंतर ती ट्रॅव्हल्स गुरुवारी दुपारी १२ वाजता पुण्याला पोहचली. या प्रकारामुळे इतरही प्रवाशांच्या कामाचा खोळंबा होत आहे.
पोलिसांकडे धाव
मंगळवारी झालेल्या चोरीनंतर संबंधित ट्रॅव्हल्स चालकाने येरवडा येथे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बुधवारी रात्रीच्या चोरीनंतर संबंधित ट्रॅव्हल्स चालक हर्सूल (औरंगाबाद) पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता आॅनलाईन तक्रार देण्याचा सल्ला देऊन त्यांना परत पाठविण्यात आले.
या सर्व प्रकारात मात्र प्रवासी ट्रॅव्हल्स चालक-मालकांशी वाद घालत असल्याने नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. या मार्गावरून दररोज २० ते २५ ट्रॅव्हल्स एकामागे एक जात असतात. त्यामुळे एका ट्रॅव्हल्सचा वेग कमी झाला की सर्वच ट्रॅव्हल्स थांबतात व चोरट्यांना हे चांगलेच फावत आहे.
गुरुवारी झाली वाच्यता
चोरीचे असे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र या बाबत कोणी वाच्यता करीत नव्हते. मात्र बुधवारच्या घटनेनंतर संबंधित ट्रॅव्हल्स मालकाने हा विषय काढल्याने दुसºयानेही असा प्रकार मंगळवारीही घडल्याचे सांगितले. असे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, मात्र त्या बद्दल कोणी बोलत नव्हते, असेही ट्रॅव्हल्स मालकांकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळेच अनेक ट्रॅव्हल्स चालक डिक्कीला दोन ते तीन कुलूप लावण्यासह दोरखंडानेही बांधत आहे. तरीदेखील चोरीच्या घटना सुरू असल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ट्रॅव्हल्सचा वेग कमी झाला की डिक्कीतून प्रवाशांचे साहित्य चोरीस जात आहे. बुधवारी रात्री पाच प्रवाशांचे साहित्य चोरीस गेले. या प्रकारामुळे ट्रॅव्हल्सलाही विलंब होत आहे. या मार्गावरील संबंधित पोलिसांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- वसंत नेटके, ट्रॅव्हल्स मालक.
साहित्य चोरीस जात असल्याने प्रवाशांना विनाकारण भूर्दंड सहन करावा लागत आहे. मंगळवारी रात्री तीन बॅगा चोरीस गेल्यानंतर बुधवारी रात्रीही चोरीचा प्रयत्न झाला. मात्र रिक्षाचालकामुळे तो फसला.
- हितेश गडे, ट्रॅव्हल्स मालक.