मामाकडे द्वारदर्शनाला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:00+5:302021-08-14T04:20:00+5:30
जळगाव : बऱ्हाणपूर येथील मामाकडे द्वार दर्शनाला गेलेल्या नरेंद्र दामोदर बारी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख २३ ...
जळगाव : बऱ्हाणपूर येथील मामाकडे द्वार दर्शनाला गेलेल्या नरेंद्र दामोदर बारी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख २३ हजार रुपयांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील दांडेकर नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळ्यातील दांडेकरनगर येथे नरेंद्र बारी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत़ त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने ते कुटुंबासह १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता बऱ्हाणपूर येथील मामा प्रकाश बारी यांच्याकडे गेले होते. त्यामुळे घरी कुणी नव्हते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. गुरुवारी दुपारी १२ वाजता नरेंद्र बारी हे कुटुंबासह जळगाव येण्यासाठी बसने निघाले. सायंकाळी ५ वाजता घरी पोहोचल्यावर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप दिसले नाही. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी घराचे मागे जाऊन पाहिले. त्यांना मागचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. हॉलमधील कपाट चोरट्यांनी फोडलेले आढळून आले.
दागिने, रोकड लंपास
कपाटातील लॉकरची तपासणी केल्यानंतर त्यातील सोन्याचे दागिने, अंगठ्या तसेच चांदीचे भांडे तसेच रोकड असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर बारी यांनी लागलीच रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना संपूर्ण हकिकत सांगितल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
असा आहे लंपास मुद्देमाल
२१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे सात ग्रॅम वजनाची पांचाली, १२ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके तसेच ६ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र, ६३ हजार रुपये किमतीच्या २१ ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या, २ हजार ८०० रुपये किमतीचे चांदीचे सात शिक्के, १० हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या वाट्या व ९ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २३ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.