एरंडोल तालुक्यातील कढोली परिसरात जेसीबीद्वारे टेकड्या कोरून वाळूची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:57 AM2020-10-01T11:57:50+5:302020-10-01T11:58:16+5:30
बी.एस.चौधरी एरंडोल : तालुक्यातील कढोली येथे जेसीबी वापरून गिरणा नदी काठावरील, परिसरातील टेकड्या कोरून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सर्रास ...
बी.एस.चौधरी
एरंडोल : तालुक्यातील कढोली येथे जेसीबी वापरून गिरणा नदी काठावरील, परिसरातील टेकड्या कोरून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सर्रास होत आहे.
लासूर परिसर कंपनी परिसर, रविवार रहीवाड नाला परिसर व गिरणा काठ परिसर या भागात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसत आहे. जेसीबीच्या साह्याने टेकड्या कोरून अवैधरित्या वाळू काढली जाते व ती बाहेर गावांना विकली जाते.
या प्रकारामुळे गौणखनिजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष हे की महसूल यंत्रणा याकडे का दुर्लक्ष करते हा संशोधनाचा विषय ठरत आहे. हे असेच चालू राहिले तर पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकते, असे मत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केले आहे. गिरणा नदीपात्रात होणाऱ्या या चोरीच्या घटनांबरोबर नदीकाठाला व काठालगतच्या टेकड्या उदध्वस्त करून परिसर ओरबाडण्याचा हा प्रकार कधी थांबणार, असा संतप्त सवाल केला जातो. वाळूमाफियांच्या वाढत्या मुजोरीला व दादागिरीला जिल्हा प्रशासनाने लगाम लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.