...तर अंत्यसंस्कार व लग्न सोहळ्यांवरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:28 AM2021-02-18T04:28:54+5:302021-02-18T04:28:54+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : व्यापारी, हॉकर्स, हॉटेल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मनपात बैठक; मोठ्या कार्यक्रमांसाठी मिळणार नाही परवानगी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...
जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : व्यापारी, हॉकर्स, हॉटेल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मनपात बैठक; मोठ्या कार्यक्रमांसाठी मिळणार नाही परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, आता सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे. ही खबरदारी जर घेतली नाही तर भविष्यात पुन्हा अडचणी निर्माण होतील. विशेष करून लग्न समारंभ, पार्टी, मेळावे, अंत्यसंस्कार या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, यापुढे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचा भंग झाल्यास लग्न समारंभ असो वा अंत्यसंस्कार सर्वप्रकारच्या कार्यक्रमांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. तसेच नियमांचे पालन करा अन्यथा नाईलाजास्तव कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे गर्दी होत असलेल्या ठिकाणांशी संबंधित असलेल्या मंगल कार्यालयांचे मालक, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, हॉटेल चालक, हॉकर्स संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या आहेत. या बैठकीला आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, श्याम गोसावी, पवन पाटील आदी उपस्थित होते.
गर्दी आढळल्यास प्रशासनाला कळवा
एखाद्या लग्न समारंभात, हॉटेल किंवा दुकानात गर्दी वाढल्याबाबत कोणताही नागरिक प्रशासनाला कळवू शकतो. यासाठी जिल्हा, मनपा व पोलीस प्रशासनाकडून कॉल सेंटर सुरु करण्यात येणार असून, यासाठीचा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी जाहीर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
रुग्ण वाढल्यास शाळांबाबत घ्यावा लागणार निर्णय
शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसात वाढली आहे. ही संख्या पुन्हा वाढत गेली तर शाळांबाबतही निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत केले.
आताची बंधने पाळा, अन्यथा कडक बंधने पाळावी लागणार
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वांनीच खबरदारी घ्यायची आहे. प्रशासनाने नियमात कोणतीही वाढ किंवा घट केलेली नाही. जे नियम होते त्याच नियमांची अंमलबजावणी करा, जर आताची बंधने पाळलीत तर कडक बंधने पाळावी लागणार नाहीत. मात्र, आता दुर्लक्ष केले तर यापेक्षा कडक निर्बंध प्रशासनाला लावावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
उद्याने केवळ मॉर्निंग वॉकसाठी राहतील खुली
शहरातील उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची तक्रार प्रदीप जैन यांनी केली. त्यावर शहरातील सर्व उद्याने केवळ मॉर्निंग वॉकसाठी खुली ठेवण्यात येणार असून, सकाळी १० नंतर उद्याने नागरिकांसाठी बंद करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
लग्न समारंभावर करणार धडक कारवाई
शहरातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये होत असलेल्या लग्न समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे मंगल कार्यालयचालकांनी लग्नासाठी सभागृह देताना ५०पेक्षा अधिक नागरिक येणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, ५०पेक्षा अधिक नागरिक आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. प्रशासनाकडून अचानकपणे कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाचा सूचना
१. हॉटेल, कार्यालय, दुकान असो वा रिक्षा नो मास्क, नो एंन्ट्री.
२. गर्दी टाळा, नियम पाळा, कठोर निर्बंध घालण्यास भाग पाडू नका.
३. उद्याने केवळ मॉर्निंग वॉकसाठी खुली राहतील.
४. मोठ्या कार्यक्रमांना मिळणार नाही परवानगी.
५. रुग्ण वाढल्यास शाळांबाबतही निर्णय घेणार.
आयुक्तांच्या सूचना
१. दुकानात पाचपेक्षा अधिक ग्राहक आढळल्यास कारवाई होणार.
२. हॉकर्सनी नियम पाळावेत, मनपाने ठरवून दिलेल्या जागांवर व्यवसाय न केल्यास हॉकर्सवरही कारवाई.
३. मनपा आरोग्य विभागाकडून फवारणी सुरु करण्यात येईल.
४. कोणत्याही शाळेत किंवा रस्त्यालगत कार्यक्रम घेण्यात येऊ नये.
५. शहर पोलीस स्थानक परिसर, फुले मार्केट भागात हॉकर्सनी दुकाने थाटू नयेत.