‘तेव्हा’ वाटले आता भारत भूमीचे दर्शन होणार नाही
By admin | Published: April 2, 2017 11:33 AM2017-04-02T11:33:46+5:302017-04-02T11:33:46+5:30
पाकिस्तान हद्दीत गेल्यानंतर आपण पुन्हा भारतात येऊन आपल्या मातृभूमीचे दर्शन होईल असे वाटले नव्हते असे चंदू चव्हाण यांनी सांगितले.
Next
चंदू चव्हाण : मुलाखतीतून उलगडली ‘त्या’ रात्रीची आपबिती
जळगाव, दि.2 - भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या दुस:या रात्री 12 वाजता कश्मिर मधील पुंछ सेक्टर मध्ये 11 साथीदारांसोबत गस्त वर असताना अचानक पाकिस्तान आणि भारतीय सैन्यात तुफान गोळीबार झाला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे बाकीचे साथीदार माङयापासून वेगळे झाले, दोन-तीन तास सारखे चालल्यानंतर काही अधिकारी समोर आले. त्यांनी काही प्रश्न विचारले तेव्हा मला कळून चुकले की आपण बॉर्डर पार करून पाकिस्तानच्या सैन्याच्या तावडीत सापडलो.त्यांच्या सैनिकांच्या हाती लागल्यावर वाटले होते, की आता मृत्यू अटळ आहे व भारतीय भूमीचे आता दर्शन कधी होणार नाही. मात्र समस्त देशवाशियांच्या प्रार्थनेमुळेच आपण पुन्हा भारताच्या भूमीत आलो असल्याची भावना चंदू चव्हाण यांनी व्यक्त केली.
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या वतीने शनिवारी गणपती नगरातील रोटरी भवनात खान्देशपुत्र चंदू चव्हाण यांचा सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखतीत चंदू चव्हाण यांनी ‘त्या’ रात्री घडलेली व पाकिस्तानच्या तावडीतील 114 दिवसांची आपबितीा सांगितली. सी.ए.अनिलकुमार शहा यांनी चंदू चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी चंदू चव्हाणचे बंधू भुषण चव्हाण, रोटरी महेंद्र रायसोनी, नरेंद्र जैन, सचिल देवरे आदि उपस्थित होते. मुलाखती दरम्यान चंदू चव्हाण यांनी लहाणपणापासूनचा सर्व प्रवास यावेळी सांगितला.
आजी-आजोबांनीच मोठे केले
चंदू चव्हाण यांनी सांगितले की, लहान असतानाच आई-वडिलांचे निधन झाले. यामुळे लहाणपणासूनच आजी-आजोबांनीच सांभाळ केला. दहावी र्पयतचे शिक्षण आत्यांकडे झाले. आठवीत असतानाच सैन्यात जायचे हे ठरवून घेतले होते. त्यातच मोठे बंधू सैन्यात भरती झाल्यानंतर त्याचापासूनच सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली. 2013 मध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर अहमदनगरला प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2015 मध्ये जम्मु काश्मिर मधील सांभा सेक्टर मध्ये पोस्टींग झाली असा संपूर्ण प्रवास चंदू चव्हाण यांनी मांडला.
अधिका:यांशी झालेला वाद हा पाकिस्तानचा बनाव
भारतीय अधिका:यांशी वाद झाला त्यामुळे रागाच्या भरात पाकिस्तानी सिमेत दाखल झालो अशी चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा होती. भारतीय सैन्याला बदनाम करण्याचा हा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा हा बनाव होता अशी माहिती चंदू चव्हाण यांनी दिली. भारतीय सैन्यातील कुठल्याही अधिका:याशी कोणताही वाद झाला नसल्याचे चंदू चव्हाण यांनी सांगितले.
सूर्य प्रकाशही पहायला मिळाला नाही
पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांच्या लष्कराकडून नेहमी मारहाण केली जात असल्याचे चंदू चव्हाण यांनी सांगितले. तसेच इंजेक्शन दिले जात होते. जेवण अनेकदा मिळतच नव्हते. त्यानंतर त्यांनी कारागृहात रवानगी करून दिली. त्या कारागृहात नेहमी अंधार असायचा. सुर्यप्रकाश देखील पहायला मिळत नव्हता. कारागृहात अनेकदा हिंदू देवतांच्या नामस्मरणाचा आवाज ऐकायला मिळायचा, त्यावरून त्या ठिकाणी इतर भारतीय असल्याचे जाणविले. कारागृहात असताना नेहमी भक्तीगीत म्हणायचो, भारतात आल्यानंतर आधीचे आठ दिवस काहीही कळले नसल्याची माहिती चंदू चव्हाण यांनी दिली.