...तर धान्य व केळ्यांची कवडीमोल भावात करावी लागणार विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:12+5:302021-04-05T04:15:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असला तरी हा पर्याय शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असला तरी हा पर्याय शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. रब्बीची पिके विक्रीचा काळ सुरू असताना लॉकडाऊन जाहीर झाला, तर कवडीमोल भावात शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्याची वेळ येईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यातच लॉकडाऊन लागल्यामुळे एक हजार रुपयांप्रमाणे गहू व हरभरा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. तसेच केळ्यांचीही वाहतूक न झाल्यामुळे जिल्हाभरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले होते. यंदा अवकाळी व वादळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन जाहीर झाले तर शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी अडचणी येऊ शकतात. राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्याआधी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. तसेच गेल्या वर्षाप्रमाणे पुन्हा माल खरेदी विक्रीवर निर्बंध लावले तर शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती आहे.
व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे आव्हान
लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एकी करून धान्याचे भाव पाडण्याचे काम केले जाते. यासह जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळ्यांची वाहतूक थांबवून कमी भावात शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जातो व त्याची साठवणूक करून नंतर तो माल विक्री केला जात असतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आव्हाणे येथील कृषितज्ज्ञ रवींद्र काशिनाथ चौधरी यांनी व्यक्त केले.
कोट
जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत, त्या योग्य असल्या तरी लॉकडाऊन जाहीर करताना शेतकऱ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. यासह जो बाजारभाव आहे त्या भागातच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची गरज आहे.
- डॉ. सत्वशील जाधव, प्रगतशील शेतकरी
यंदा अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले, तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल योग्य भावाने खरेदी केला जाईल, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.
- किशोर चौधरी, शेतकरी, असोदा