... तर बापाचं नाव लावणार नाही; गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 05:14 PM2023-06-06T17:14:39+5:302023-06-06T17:32:12+5:30
४० लोकांनी मतं दिली तेव्हा तू खासदार झाला, तू थुंकतो काय? पहिलं राजीनामा दे
मुंबई - शिवसेना विरुद्ध शिवसेना हा वाद आता नवीन राहिला नाही. त्यातच, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतरही शिंदे गटातील इतर नेत्यावरही जबरी टीका करताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच त्यांना आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी, त्यांनी बाजुला थुंकून उत्तर देणं टाळलं. संजय राऊतांच्या या कृतीचा शिंदे गटाकडून निषेध नोंदवण्यात आला. आता, यावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर तोफ डागली. तसेच, त्यांना आव्हानही दिलंय.
४० लोकांनी मतं दिली तेव्हा तू खासदार झाला, तू थुंकतो काय? पहिलं राजीनामा दे. ते म्हणाले शिवसैनिकांनी मतं दिली, हा तुझा बाप आला होता इथं मत द्यायला, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार राऊत यांच्या थुंकण्यावर आणि टीकेवर पलटवार केला. तसेच, तुमच्या छताडावर भगवा रोवून हा गुलाबराव पाटील पुन्हा निवडून येणार आहे, असे चॅलेंजही पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिले. गुलाबराव दिवसभर गिर गिर.. गिर गिर... फिरतो. मंत्रीपद कधी घेऊन मिरवत नाही, तुम्ही गुलाबराव पाटलाच्या नादी लागू नका, मी माझ्या अवतारावर गेलो ना तुम्हाला पळणं मुश्कील होईल. ही जागा शिवसेनेची आहे ना, घे, चारी मुंड्या चित नाही केलं ना, तर बापाचं नाव नाही लावणार, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी आगामी निवडणुकीत मीच निवडून येईन, असा विश्वास बोलून दाखवला,. तर, संजय राऊत यांच्यावर जोरदार शब्दात प्रहार केला.
दरम्यान, संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर निशाणा साधताना त्यांना निवडणुका आल्यानंतर तुम्हाला समजेल, असे म्हणतात. तसेच, हिंमत असेल तर निवडणुकांच्या मैदानात उतरा, मग शिवसैनिक तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणतात. त्यावरुनही गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला. तसेच, आगामी निवडणुकीत मीच निवडून येणार असे भाकीतही केले.