...तर सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा घोटाळा येणार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:27 PM2018-11-16T23:27:28+5:302018-11-16T23:28:25+5:30

विश्लेषण

 ... then there will be a big scandal in the Public Works Department | ...तर सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा घोटाळा येणार उघडकीस

...तर सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा घोटाळा येणार उघडकीस

Next

सुशील देवकर
जळगाव: सार्वजनिक बांधकाम विभागातील ई-निविदा प्रकरणात अधिकारी व मक्तेदारांनी संगनमत केल्याने सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या कार्यालयातीलच संगणकावरून बनावट ई-मेल तयार करून खोटे कागदपत्र खरे असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करून त्याआधारे सुमारे ७ ते ८कोटींची कामे मर्जीतील मक्तेदारांना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अद्याप यातील केवळ एकाच ५६ लाखांच्या कामाच्या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.मात्र अधिक खोलात गेल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
एकाच प्रकरणात दाखल तक्रारही सहजासहजी दाखल झालेली नाही. तक्रारदाराने बनावट ई-मेल केल्याचे उघडकीस आणून दिल्यावर व अनेक सबळ पुरावे दिल्यावर जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या आदेशानंतरही काही महिन्यांनी ही तक्रार देण्यात आली. त्यातही केवळ मक्तेदाराविरूद्धच गुन्हा दाखल करण्यात आला. अधिकाऱ्यांना सोयीस्करपणे वगळण्यात आले. ‘लोकमत’ने या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनीही हालचाल सुरू केली. त्यानंतर मात्र याप्रकरणी तपासाला गती आली आहे. मात्र बनावट दस्तावेज वापरून निविदा मिळविण्याचे प्रकार आताचे नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून हे सत्र सुरू आहे. आताशी केवळ एकाच निविदेतील एका कामाच्या चौकशीतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली असून या साखळीतील अजून अनेक अधिकारी, कर्मचारी आपल्यालाही अटक होणार, या विचाराने धास्तावले आहे. एक-दोघांनी तर सुटी टाकून अज्ञातस्थळी पलायन केले आहे. फोनही बंद करून ठेवले असल्याचे समजते. एकाच प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांची ही परिस्थिती झाली आहे. पोलिसांनी इतर कामांमधील याच सहगल इंडस्ट्रीजच्या नावाची बनावट प्रमाणपत्र आणखी कोणी सादर केली आहेत? याचीही माहिती मागविली आहे. तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या निविदेतील अन्य दोन मक्तेदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारेच कामे मिळविली असताना त्यांच्याविरूद्ध व अधिकाºयांविरूद्ध गुन्हे का दाखल झाले नाहीत? अशी विचारणा पत्राद्वारे केली आहे. तसेच विधानसभेत हा विषय उचलण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. पोलीस यंत्रणा किती पारदर्शीपणे तपास करते? यावर या घोटाळ्याचे स्वरूप ठरणार आहे. पोलिसांनी प्रामाणिकपणे व दबाव झुगारून तपास केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title:  ... then there will be a big scandal in the Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.